Join us

यंदा निम्मे साखर कारखाने कमी ऊस उत्पादनामुळे बंद; साखर परिषदेस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 01:43 IST

केंद्र सरकारने किमान विक्री किंमत आणि इथेनॉलच्या बाबतीत नवीन धोरणाचा अवलंब करून साखर उद्योगाला तोट्यात जाण्यापासून वाचवले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात यंदा उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे राज्यातील ५० टक्के साखर कारखाने बंद आहेत; त्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात ४० टक्के घट होणार आहे. राज्यातील जे साखर कारखाने बंद आहेत ते सुरू करण्यासाठी सरकारने लवकरच अनुकूल धोरण आखायला हवे, अशी मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या साखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी सरकारने अनुकूल धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या वेळी उत्तर प्रदेश सरकारचे ऊस मंत्री सुरेश राणा, केंद्रीय खाद्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव कमल दत्ता, कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा, असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल विठलानी, नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज्चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

सुरेश राणा म्हणाले, २०१५-१६ मध्ये शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपयांचा एकूण परतावा देण्यात आला होता. २०१७-१८ मध्ये ३५ हजार ४०० कोटी रुपयांचा परतावा शेतकऱ्यांना देण्यात आला. केंद्र सरकारने साखरेबाबत दुहेरी किमतीच्या धोरणाचा वापर केला पाहिजे; त्यामुळे घरगुती वापरापेक्षा जास्त भावामध्ये कॉर्पोरेट सेक्टरला साखर मिळेल.

प्रफुल विठ्ठलानी म्हणाले, केंद्र सरकारने किमान विक्री किंमत आणि इथेनॉलच्या बाबतीत नवीन धोरणाचा अवलंब करून साखर उद्योगाला तोट्यात जाण्यापासून वाचवले आहे. या परिषदेमध्ये ज्या सूचना जाणकारांकडून येतील त्या आम्ही केंद्र सरकारसमोर मांडू.गतवर्षी राज्याचे साखर उत्पादन ९३ लाख टन होते. या वर्षी ते घटून ५५ लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील वर्षी महाराष्ट्रातील साखर उत्पादन दुप्पट वाढेल. महाराष्ट्र हे देशात साखर आणि इथेनॉलचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. इथेनॉलचे उत्पादन केल्यामुळे देशात होणारी कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. ज्यामुळे देशाचे परकीय चलन वाढण्यास मदत झाली आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :साखर कारखाने