Join us  

मुंबईत आरटीईच्या निम्म्या जागा अजूनही रिक्तच, प्रतीक्षा यादीत केवळ ४४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 1:54 AM

Right To Education News : मुंबई विभागात यंदा आरटीई प्रवेशांसाठी ३६७ शाळांनी नोंदणी केली असून एकूण ७२०२ जागा उपलब्ध आहेत.

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांर्गत (आरटीई) २५ टक्के अंतर्गत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची अंतिम मुदतवाढ गुरुवारी संपली. या मुदतीनंतर प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या १३२८ विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे पहिली फेरी आणि प्रतीक्षा यादी झाल्यानंतर आता मुंबई विभागात अजून आरटीईच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी पुढील १० दिवसांत आणखी एका फेरीचे नियोजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई विभागात यंदा आरटीई प्रवेशांसाठी ३६७ शाळांनी नोंदणी केली असून एकूण ७२०२ जागा उपलब्ध आहेत. यामधील ६५० जागा या पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी तर पहिली इयत्तेसाठी ६५०२ जागा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध आहेत. यंदा संपूर्ण राज्यात प्रवेश प्रक्रियेचि पहिली फेरी एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली होती. त्यानुसार १७ मार्च २०२० रोजी पहिली सोडत काढण्यात आली होती. मुंबईतून पहिल्या सोडतीत निवड झालेल्या ५३७१ विद्यार्थ्यांपैकी ३१३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यानंतर प्रतिखा यादीसाठी १३२८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी पालक शहरात नसल्याने प्रवेश घेऊ शकले नाहीत.  प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होण्यापूर्वी शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. गुरूवार, २९ ऑक्टोबर रोजी ही मुदत संपल्यानंतर केवळ ४४९ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती होऊ शकली.पहिली फेरी व प्रतीक्षा यादी मिळून एकूण ३५८७ जागांवर प्रवेशनिश्चिती होऊ शकली आहे. त्यामुळे मुंबई विभागातील आरटीईच्या उपलब्ध जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा अद्याप रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी १० दिवसांत आणखी एका फेरीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. 

शाळांचे अर्ज ३६७ शाळा , १४ हजार १३५ अर्ज विद्यार्थ्यांची निवड पहिली- फेरी  ५३७१ विद्यार्थ्यांची निवड , प्रवेश निश्चिती - ३१३८प्रतीक्षा यादी १३२८ विद्यार्थ्यांची निवड, प्रवेश निश्चिती - ४४९ मुंबई विभागात एकूण उपलब्ध जागा ७१६५ ; आतापर्यंत एकूण प्रवेश - ३५८७

टॅग्स :शिक्षणशाळाशिक्षण हक्क कायदा