धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 07:01 IST2025-05-30T07:01:34+5:302025-05-30T07:01:55+5:30
५०% जागा सार्वजनिक सुविधांसाठी वापरली जाणार

धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
मुंबई :धारावीमधील एकूण ६२० एकर जागेपैकी पुनर्वसनासाठी अयोग्य असलेल्या मालमत्तांची जागा वगळून उरलेल्या जमिनीतून ५० टक्के जागा ही सार्वजनिक सुविधांसाठी वापरली जाणार आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा, दर्जेदार सार्वजनिक सेवा सुविधा, रस्त्यांचे जाळे आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा यामुळे धारावीचा कायापालट होणार आहे.
धारावीत आजमितीला विविध योजनांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारती आणि मालमत्ता अस्तित्त्वात आहेत. अशा मालमत्ता सुमारे १०६ एकर जागेवर अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे धारावीमधील ६२० एकर जागेपैकी १०६ एकर जागा पुनर्वसनातून वगळण्यात येणार आहे. उर्वरित जागेतील ५० टक्के जागेचा वापर हा सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित सुत्रांनी दिली.
पुनर्वसनातून वगळलेल्या मालमत्ता, प्रस्तावित रस्ते, इतर विकासासाठी प्रस्तावित असलेली रेल्वेची जागा, सांडपाणी वाहून नेणारे नाले, टाटा पॉवरचे विद्युत केंद्र, पम्पिंग स्टेशन आणि इतर अत्यावश्यक सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक असलेली जागा वगळून उर्वरित जागा प्रत्यक्ष पुनर्वसन प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. धारावीत विकसित झालेल्या अथवा होणाऱ्या अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्ता पुनर्वसन प्रकल्पातून वगळण्यात येणार आहेत.
५०% जागा सार्वजनिक सुविधांसाठी वापरली जाणार
५० टक्के धारावी अधिसूचित क्षेत्र ६२० एकर
प्रस्तावित रस्त्यांसाठी १०९ एकर जागा
खेळाची मैदाने, माहीम निसर्ग उद्यान, हरित भूखंड आणि इतर मोकळे भूखंड यासाठी ९९ एकर जागा
बस डेपो, शाळा, पार्किंग अशा सार्वजनिक सुविधांसाठी २७ एकर जागा
पर्जन्यजल वाहिन्या आणि इतर जलस्रोत यासाठी ७ एकर जागा
उर्वरित जागेत निवासी, व्यावसायिक पुनर्वसन, नूतनीकरण प्रकल्प व विक्रीयोग्य घटक उभारले जातील.