मुंबईच्या रुग्णालयांतील निम्म्या खाटा भरल्या, पुढील चार, सहा आठवडे महत्त्वाचे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 09:50 AM2021-03-20T09:50:01+5:302021-03-20T09:50:39+5:30

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने काळजी केंद्रे बंद केली. तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राखीव खाटाही कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

Half the beds in Mumbai's hospitals are full, the next four, six weeks are crucial | मुंबईच्या रुग्णालयांतील निम्म्या खाटा भरल्या, पुढील चार, सहा आठवडे महत्त्वाचे 

मुंबईच्या रुग्णालयांतील निम्म्या खाटा भरल्या, पुढील चार, सहा आठवडे महत्त्वाचे 

Next

मुंबई:  कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका व खासगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्णवाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहेत. या काळात बाधित रुग्‍णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सौम्‍य, मध्‍यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांसाठी पुरेशा संख्‍येने खाटांची गरज भासणार आहे. यासाठी महापालिकेने गेल्यावर्षीप्रमाणेच रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. 

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने काळजी केंद्रे बंद केली. तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राखीव खाटाही कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर दोन आठवड्यांपासून दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी तब्बल तीन हजार बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत २० हजार १४० बाधित रुग्ण आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने चाचणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांचा आढावा पालिका आयुक्तांनी घेतला. 

अवास्तव बिल आकारल्यास खबरदार - आयुक्त
काही खासगी रुग्‍णालये रुग्‍णांना दाखल करून घेताना अग्रीम रक्‍कम भरण्‍याचा आग्रह धरत असून त्‍याशिवाय रुग्‍णांना दाखल करून घेत नसल्‍याचे समोर आले आहे. अशा रुग्‍णालयांनी ८० टक्‍के सरकारी कोट्यातील खाटांवर दाखल करून घेताना अग्रीम रक्‍कमेचा आग्रह धरु नये. तसेच शासनाच्या दरानुसार रुग्‍णांना देयक द्यावे. रुग्‍णालयांमध्‍ये कोविड-१९ उपचारांसाठी कोणत्‍या सुविधेला किती दर आकारले जातात, त्‍याचे दर्शनी फलक लावावेत. खासगी रुग्‍णालयांमध्‍ये पुन्‍हा नव्‍याने पालिकेचे प्रत्येकी दोन लेखापरीक्षक नेमण्‍यात येणार आहेत. रुग्‍णांना महागडी औषधी, इंजेक्‍शन आदी पुरविताना खासगी रुग्‍णालयांनी रुग्‍णांच्‍या नातेवाईकांची संमती घ्‍यावी. तसेच व्‍यवहारामध्‍ये पारदर्शकता ठेवावी. जेणेकरून नंतर देयकांबाबत वाद निर्माण होणार नाहीत, असे आयुक्तांनी बजावले आहे.

लक्षणे नसल्यास घरीच घ्या उपचार
लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ८० टक्के आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अकारण रुग्णालयात दाखल होऊ नयेत, जेणेकरून बाधित रुग्णांसाठी खाटांची अडचण निर्माण होईल. घरी  विलगीकरणाची सोय नसल्यास पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रमुख रुग्णालयांत खाटा भरल्या
मोठ्या रुग्णालयांमध्ये चांगले उपचार मिळतील असा लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे अंधेरी येथील सेव्हन हिल्ससारख्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. 

...तरच थेट वॉक इन भरती
शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये कोविड-१९ रुग्‍णांना दाखल करताना वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातूनच व्‍यवस्‍थापन करण्‍यात येते. खासगी रुग्‍णालयांमध्‍येदेखील रुग्‍ण दाखल करताना सर्वप्रथम वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातूनच कार्यवाही करावी. तीव्र बाधा असलेल्‍या, अतिदक्षता उपचारांची आवश्‍यक असलेल्‍या रुग्‍णांना ते थेट आल्‍यास (वॉक इन) दाखल करून घ्‍यावे. मात्र, अशा रुग्‍णांची माहिती वॉर्ड वॉर रुमला तत्‍काळ कळवावी, अशी सूचना पालिकेने केली आहे.
 

Web Title: Half the beds in Mumbai's hospitals are full, the next four, six weeks are crucial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.