Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता केस कापणे होणार महाग; पन्नास टक्के दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 07:08 IST

केशकर्तनासाठी ग्राहकांना यापूर्वी ८० ते १०० रुपये खर्च करावे लागत होते. आता यापुढे या दरांमध्ये वाढ होऊन १६० ते २०० रुपये इतका खर्च येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सलूनमध्ये आता यापुढे केस कापणे आणि दाढी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कोरोनापासून ग्राहकांच्या सुरक्षेच्या नावावर मुंबई सलून ब्यूटीपार्लर असोसिएशनने आपल्या प्रत्येक सेवेवर सुमारे पन्नास टक्क्यांपर्यंत दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

केशकर्तनासाठी ग्राहकांना यापूर्वी ८० ते १०० रुपये खर्च करावे लागत होते. आता यापुढे या दरांमध्ये वाढ होऊन १६० ते २०० रुपये इतका खर्च येणार आहे. दाढीसाठी ५० रुपयांऐवजी आता शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. तर फेस मसाज आणि फेशियलसह अन्य सेवांसाठी ग्राहकांना आधीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे. तसेच आता प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवली जाणार आहे. त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक मागण्यात येणार असून नोंद करण्यात येणार आहे. यानंतर तापमान मोजल्यानंतरच ग्राहकांना प्रवेश दिला जाणार आहे. गर्दीपासून वाचण्यासाठी ग्राहकांच्या अपॉइन्मेंटनुसार त्यांना बोलवण्यात येणार आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष तुषार चव्हाण यांच्यानुसार दरांची वाढ ही नफा कमवण्यासाठी नसून ही वाढ सुरक्षा देण्यासाठी करण्यात आली आहे. ही दरवाढ शनिवारी रात्रीपासून संपूर्ण मुंबईमध्ये लागू होईल.

क्लिनिकल सलून असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांच्यानुसार कोरोनामुळे सलूनांचे रूप बदलले आहे. ग्राहक आणि सलून वर्कर यांचा थेट संपर्क येत असल्याने आता सलूनना क्लिनिकल सलूनच्या रूपात बदलावे लागणार आहे. कोरोनापासून स्वत:चे आणि ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक सलूनच्या मालकाला महिन्याला साधारणत: ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे. यामध्ये कामगारांसाठी पीपीई किट, ग्लोज आणि सलून सॅनिटराईझ करण्याचा खर्च करावा लागणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मालकांना सलूनमध्ये दररोज सॅनिटाईझ करावे, असा आम्ही निर्णय घेतला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

प्रशिक्षण नंतर कामगेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे कामगार गावाला गेले आहेत. कामगार गावावरून आल्यावर त्यांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. यानंतर पीपीई किट देण्यात येईल. त्यानंतर सलून सुरू करण्यात येणार असल्याचे १० सिजर सलूनचे मालक सचिन सावंत यांनी सांगितले.रचनेतही होणार बदलकेस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकांना आता वाट पाहावी लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंंगचे पालन करण्यासाठी चार खुर्ची असलेल्या सलूनमध्ये आता फक्त दोनच खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक खुर्च्यांमध्ये दोन मीटरचे अंतर ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस