लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तयार केलेल्या ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या ग्रुपमध्ये हॅकरने एंट्री करत एपीके फाइल शेअर केली. या फाइलवर क्लिक करताच पोलिसाचे साडेसात लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्याने त्यांच्या नावाने कर्ज घेत ती रक्कम अन्य ठिकाणी वळवली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांसह सायबर पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, नवी मुंबईतील रहिवासी असलेले पोलिस शिपाई हे सप्टेंबर २०२४ पासून ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ट्रॉम्बे पोलिस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यासाठी पोलिस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार आणि पोलिस ठाणे हद्दीतील काही प्रतिष्ठीत व्यक्तींचा मोहल्ला कमिटी ट्रॉम्बे नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
तक्रारदार असलेल्या या ग्रुपमध्ये २२ जुलैच्या दुपारी आरटीओ चलान एपीके फाइल आली. फाइलमध्ये काय आहे ते बघण्यासाठी तक्रारदार यांनी त्या फाइलवर क्लिक केले. मात्र, काहीच ओपन झाले नाही. पण, सायबर ठगांना त्यांच्या मोबाइलचा ॲक्सेस मिळाला. काही वेळातच त्यांच्या मोबाइल नंबरवर आर्थिक व्यवहारांचे मॅसेज यायला सुरुवात झाली. त्यांच्या बँक खात्यावर सायंकाळी सहा वाजता ७.५८ लाख रुपये जमा झाल्याचा संदेश आला. त्यानंतर अवघ्या १२ मिनिटांत खात्यातून ४ लाख ९९ हजार आणि पुढच्या मिनिटात २ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम अन्य खात्यात वर्ग झाली.
सायबर फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने पोलिस शिपायाने तत्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवली. तांत्रिक अडचणीमुळे तक्रार नोंद झाली नाही. त्यांनी पुन्हा तक्रार नोंदविली.
फाइल पाठविणाऱ्याचा मोबाइलही हॅक
ट्रॉम्बे पोलिसांनी एपीके फाइल पाठविणाऱ्या अज्ञात मोबाइल नंबर धारकाला पोलिस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी केली असता, त्याचे व्हॉट्सॲप ही एपीके फाइल ओपन केल्याने हॅक झाल्याचे लक्षात आले. त्याच्या व्हॉट्सॲपवरून अन्य लोकांना त्याच्या नकळत ही एपीके फाइलची लिंक आपोआप पाठवल्याचे उघड झाले.
अशी झाली फसवणूक
सायबर भामट्याने एपीके फाइलद्वारे मोबाइलचा ताबा मिळवला. पुढे बनावट कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स तयार करून बँकेस सबमिट करत पर्सनल लोन मंजूर करून हे पैसे अन्य ठिकाणी वर्ग केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.