वडाळ्यात आयएएस अधिकाऱ्यांसाठी १३,८४३ मीटरवर साकारणार जिमखाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 07:42 IST2025-10-05T07:42:26+5:302025-10-05T07:42:40+5:30
६,४७५ चौरस मीटरवर ईव्हीएमसाठी गोदाम

वडाळ्यात आयएएस अधिकाऱ्यांसाठी १३,८४३ मीटरवर साकारणार जिमखाना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळ्यातील २०,३१८.८२ चौरस मीटर खारभूमीचे विकास क्षेत्रात रूपांतर करण्यात येणार असून, त्या जमिनीपैकी १३,८४३ चौरस मीटरवर आयएएस अधिकाऱ्यांसाठी जीमखाना उभारण्यात येणार आहे. तसेच, ६,४७५ चौरस मीटर जमिनीवर ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्ससाठी गोदाम उभारण्यात येणार आहे. खारभूमीचे विकास क्षेत्र म्हणून रूपांतर करण्यासंदर्भात राज्य सरकारने शनिवारी सूचना जारी केली. याबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत.
या जमिनीपैकी काही जमिनीचा वापरही होत आहे. मुंबईच्या विकास आराखड्यानुसार या जमिनी नैसर्गिक क्षेत्र म्हणून दर्शवण्यात आल्या होत्या. तसेच, त्या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बेस्ट डेपो किंवा नैसर्गिक क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्याच्या दृष्टीने होत्या. त्यामुळे या प्रस्तावित बदलासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत नागरी विकास विभागाने जाहीर सूचना प्रसिद्ध केली.
काही भाग एमएमआरसीला तात्पुरत्या वापरासाठी
गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला पत्र पाठवून ६,४७५ चौ.मी. व १७,६८९ चौ.मी. खारभूमीवरील नैसर्गिक क्षेत्र हटवण्याची विनंती केली होती. तसेच, ही जमीन सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. या जमिनीपैकी काही भाग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे तात्पुरत्या वापरासाठी दिल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, गेल्या वर्षी राज्य सरकारने आयएएस जिमखान्यासाठी ही जमीन आयएएस असोसिएशनला देण्याचा निर्णय घेतला होता, म्हणूनच मुंबईच्या विकास आराखड्यात बदल करण्यासाठी नगरविकास विभागाला निर्देश देण्यात आले.
पूर्वी येथे ठेवल्या जात ईव्हीएम मशिन्स
पूर्वी ईव्हीएम मशिन्स ठेवण्यासाठी अन्नधान्याच्या गोदामांचा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, रेल्वे कार्यालयांचे काही भाग, शाळा आदी जागांचा उपयोग केला जात असे. मात्र आता राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष गोदामे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये अशी गोदामे आधीच उभारली आहेत. त्यामुळे आता मुंबईसाठी इव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स ठेवण्याच्या दृष्टीने वडाळ्यातील ६,४७५ चौ.मी. जागेचा वापर करण्यात येणार आहे.