आखाती युद्धामुळे बांधकाम प्रकल्पांचा खर्च वाढणार; विकासक चिंतेत, घरे महाग होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 08:29 IST2026-04-08T08:28:05+5:302026-04-08T08:29:57+5:30
बांधकामांचा वेग कमी झाल्याने १० ते १५ टक्के कामगार गावी परतले; प्रकल्पांचा वेग मंदावण्याची भीती

आखाती युद्धामुळे बांधकाम प्रकल्पांचा खर्च वाढणार; विकासक चिंतेत, घरे महाग होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आखाती देशांमध्ये सुरू युद्धाचे पडसाद आता मुंबईसह महामुंबईतील बांधकाम क्षेत्रावर उमटू लागले आहेत. आयात होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने प्रकल्पांचा वेग मंदावला आहे. तर बांधकामाचा वेग कमी झाल्याने कामगारांवरही परिणाम झाला आहे. काम कमी झाल्याने अंदाजे १० ते १५ टक्के कामगार गावी परतल्याची माहिती बिल्डरांनी दिली. यामुळे प्रकल्पांना विलंब होण्याची भीती आहे.
बांधकामासाठी टाइल्स, कच्चा माल व इतर साहित्य प्रामुख्याने आखाती देशांतून समुद्री मार्गाने भारतात येते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्री मार्गावर निर्बंध आले. परिणामी जहाजांना वळसा घालून यावे लागत असून कंटेनरमागे सुमारे साडेतीन लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
घरे महाग होण्याची भीती
युद्धाचा मोठा फटका म्हणजे प्रकल्पाची किंमत वाढेल. त्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती आहे. युद्ध संपल्यानंतर किंवा त्याची झळ कमी झाल्यावर घरांच्या किमतींत पाच ते सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ग्राहक तयार प्रकल्पांकडे अधिक कल दाखवत असून नव्या प्रकल्पांत गुंतवणूक करण्यास कचरत आहेत.
गॅसच्या तुटवड्यामुळेही बांधकाम प्रक्रियेवर परिणाम होत असून दोन ते तीन महिने परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे गृहनिर्माण प्रकल्प नियोजित मुदतीत पूर्ण होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर, सुरू असलेल्या प्रकल्पांना मुदतवाढ देण्याबाबत संघटना ‘महारेरा’कडे पाठपुरावा करणार आहेत.
- आनंद गुप्ता, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया
सिमेंट, पोलाद, ॲल्युमिनियम आणि पेट्रोकेमिकल यांसारख्या बांधकाम साहित्यांवर महागाईचा परिणाम होत आहे. युद्धाची परिस्थिती दीर्घकाळ टिकली, तर प्रकल्पांना विलंब होण्याऐवजी विकासकांच्या नफ्यावर (मार्जिन) दबाव येऊ शकतो; कारण वाढलेल्या खर्चाचा भार सोसणे हे आव्हान ठरेल. दरम्यान, बहुतेक विकासकांनी (डेव्हलपर्स) साहित्याचा साठा (इन्व्हेंटरी बफर) राखून ठेवला आहे.
-प्रशांत शर्मा, अध्यक्ष, नरेडको, महाराष्ट्र
टाइल्सचा तुटवडा जाणवत असतानाच स्टील, लोखंड आणि इतर धातूंच्या किमतींतही वाढ होत आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे प्रकल्प खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रतिचौरस फुटांमागील बांधकाम खर्च वाढत असून घरांच्या किमतींतही भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे.