Join us
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेवर गुजराती समाजाचा एक आमदार हवा - दिनकर रायकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 03:34 IST

महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी हेमराज शहा यांनी आजवर खूप चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार रायकर यांनी काढले.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर एक गुजराती समाजाचा आमदार जायला हवा; यासाठी गुजराती समाजाने एकत्र येत सरकारकडे विनंती करावी. तसे झाल्यास हेमराज शहा यांच्यासारख्या माणसाला विधान परिषदेत पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांनी केले. महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी हेमराज शहा यांनी आजवर खूप चांगले काम केले आहे, असेही गौरवोद्गार रायकर यांनी काढले.महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या वतीने शनिवारी दादर येथील योगी सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिनकर रायकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष हेमराज शहा यांच्या नेतृत्वाखाली या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.रिझवान अदातीया व शिराज अंदानी यांना विश्व गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्मश्री सरिता जोशी, असितकुमार मोदी, दिलीप जोशी, पद्मश्री आनंदजी शहा-कल्याणजी आनंदजी, वीरेन ठक्कर यांना भारत गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. राजीव खांडेकर, निवेदिता सराफ, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, दिलीपभाई लाखी, डॉ. मेघना सवैर्या, चेतन गढवी, नीरू झिंझुवाडिया, अरुणभाई मुछाला, अरविंद मेहता, हिरालाल मृग, भरत दौलत व नीलेश पटेल यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.मधु मंगेश कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्रात गुजराती आणि मराठी समाज पिढ्यान्पिढ्या गुण्यागोविंदाने राहत आहे. मराठी व गुजराती या भाषा भारतमातेच्या दोन भगिनी आहेत. हेमराज शहा हे एक अजब रसायन आहे. ते आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम करत आले आहेत. गुजरातने महाराष्ट्राला महात्मा गांधींच्या रूपात एक राष्ट्रसंत दिला. गांधींच्या ‘चले जाव’ या दोन शब्दांनी ब्रिटिश सरकार हादरून गेले. चले जावच्या त्या आठवणी मुंबईत आजही गोवालिया टँक येथे आहेत. तर महाराष्ट्राने गुजरातला सयाजी गायकवाड यांच्या रूपात एक अत्यंत चांगला राजा दिला.

टॅग्स :विधान परिषद