Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2026 Swagat Yatra: लालबाग-परळमध्ये नववर्ष स्वागत यात्रा; ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे होणार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:17 IST

Lalbaug-Parel Gudi Padwa Swagat Yatra 2026: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमुळे संपूर्ण मुंबईत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. विशेषतः लालबाग-परळमध्ये नववर्ष स्वागत यात्रा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली असून, या माध्यमातून शिवकालीन इतिहासाचा जागर केला जाणार आहे. गिरणगावच्या या ऐतिहासिक पटलावर संस्कृती आणि शौर्याचा मिलाफ या यात्रेच्या निमित्ताने मुंबईकरांना अनुभवता येईल.

मुंबई : गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे १९ मार्चला गुढीपाडव्यानिमित्त लालबाग-परळ परिसरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत ‘श्री शिवभारत आणि शिवशंभू संचलन’ या स्वरूपात शिवजागर साकारला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर त्यांच्या पार्थिवावर अर्पण केलेली स्वतःच्या गळ्यातील ३६४ समुद्री कवड्यांची ‘राजमाळ’ यात्रेत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सरसेनापती येसाजी कंक यांची ऐतिहासिक तलवारही यात्रेत पाहायला मिळणार आहे. यात्रेत शिवकालीन पराक्रमी सरदार घराण्यांचा सहभाग असणार असून, सुभेदार तानाजी मालुसरे घराणे (महाड), सरदार कृष्णाजी नाईक बांदल घराणे (हिरडस मावळ), सरसेनापती हंबीरराव मोहिते घराणे (तळबीड-कराड), सरसेनापती येसाजी कंक घराणे (भुतोंडे) तसेच श्रीमंत राजे पवार घराणे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच श्री शिवराज्याभिषेकाचे थ्री डी शिल्प, गड-दुर्गांच्या प्रतिकृती, महिला संस्थांकडून मर्दानी खेळ व मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे, अशी माहिती संयोजक मिलिंद खोत यांनी दिली.

लालबाग-परळमधील ही स्वागत यात्रा केवळ एक मिरवणूक नसून तो एक भावनिक सोहळा आहे. शिवकालीन वारसा सांगणारी ही शस्त्रे आणि त्या महान सरदारांचे वंशज एकाच छताखाली येणे, ही मुंबईकरांसाठी मोठी पर्वणी आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्वागत यात्रेत सहभागी व्हावे.

--------

English
हिंदी सारांश
Web Title : Gudi Padwa 2026: Lalbaug-Parel welcomes New Year with historical arms display.

Web Summary : Lalbaug-Parel celebrates Gudi Padwa with a procession showcasing Shivaji Maharaj's Rajmal and Yesaji Kank's sword. Descendants of valiant Maratha sardars participate, displaying Maratha heritage. A 3D Shivaji coronation sculpture and martial arts performances will also feature.
टॅग्स :गुढीपाडवा 2026गुढीपाडवामुंबईछत्रपती शिवाजी महाराजभारतीय उत्सव-सण