उत्साहाचा पाडवा, खरेदीची गुढी ! बाजारपेठांमध्ये फुले, पूजा साहित्य, मिष्टान्नाची जोरदार विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 11:38 IST2025-03-30T11:37:58+5:302025-03-30T11:38:24+5:30
Mumbai News: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या तयारीसाठी शनिवारी सकाळपासून मुंबईकरांची लगबग सुरू होती. गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य, पूजेचे साहित्य तसेच मिष्टान्न, मिठाई याची खरेदी करण्यासाठी दादर, लालबाग, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, बोरीवली व अंधेरी येथील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती.

उत्साहाचा पाडवा, खरेदीची गुढी ! बाजारपेठांमध्ये फुले, पूजा साहित्य, मिष्टान्नाची जोरदार विक्री
मुंबई - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या तयारीसाठी शनिवारी सकाळपासून मुंबईकरांची लगबग सुरू होती. गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य, पूजेचे साहित्य तसेच मिष्टान्न, मिठाई याची खरेदी करण्यासाठी दादर, लालबाग, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, बोरीवली व अंधेरी येथील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. अनेकांनी सोने-चांदीच्या वस्तू, मोबाइल, विद्युत उपकरणांचे बुकिंग करत पाडव्याच्या मुहूर्तावर ते घरी नेण्याचा निर्णय घेतला. बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाल्याने व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण होते.
दादर येथील फुलमार्केटमधील व्यापारी सदानंद मंडलिक यांनी सांगितले की, पाडव्यानिमित्त खरेदीसाठी शुक्रवारपासून मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. पाडवा आणि रमजान ईद एकत्र आल्याने फुलांची मागणी वाढली होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी यात आणखी भर पडली. पिवळा आणि केशरी झेंडूच्या फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली.
झेंडू, मोगऱ्याला मागणी
झेंडूचा भाव प्रतिकिलो १०० ते ३०० रुपयांपर्यंत होता. शेवंतीची १५० ते ३०० रुपये, मोगऱ्याची एक हजार ते दोन हजार रुपये किलो दराने विक्री झाली. गुलाबाची प्रतिजुडी १०० ते २०० रुपयांना विकली गेली. आर्किडचा भाव ४०० ते ६०० रुपयांपर्यंत होता. इतर शोभेची, सुवासिक फुले, गजरे, आंब्याचे डहाळे, कडुलिंबाची पाने यांनाही मागणी होती, असे मंडलिक यांनी सांगितले.
सोन्याचा भाव शनिवारी ९१ हजार ७०० रुपये प्रतितोळा होता. सध्या भाव वाढले असले तरी पाडव्यामुळे ग्राहकांकडून खरेदी सुरू आहे. डॉलरच्या भावातील चढ-उतारामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.
- निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते
सोन्या-चांदीच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी आहे. गुढीपाडव्याला पूजा करण्यासाठी नाण्यांची खरेदी-विक्री अधिक होत आहे. भाव जास्त असला तरी पाडवा, लग्नखरेदीमुळे ग्राहक सोने घेत आहेत.
- कुमार जैन, सोने व्यापारी
सिद्धिविनायक मंदिरात आज लिलाव
प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात गुढीपाडव्याचे निमित्त साधून गणरायाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
कुर्ला, विक्रोळीत विविध कार्यक्रम
कुर्ला पूर्वेतील नेहरूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये रविवारी सायंकाळी ६ वाजता ‘झेंडा मराठीचा जनामनात रोऊ या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भायखळा येथील मंदार निकेतन उत्सव मंडळाने यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त रक्तदानावर भर दिला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. तर, विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथे सायंकाळी ४ वाजता बालगंधर्व मैदान येथून नववर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.