GST: ‘जीएसटी’चे पैसे वाढतात कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 15:16 IST2023-09-11T15:16:37+5:302023-09-11T15:16:56+5:30
GST: ऑगस्ट महिना हा नेहमीच करापासूनच्या उत्पन्नासाठी मंदीचा महिना समजला होता. कारण एकंदरीतच सर्वसामान्य नागरिकांचे खर्चाचे आणि उत्पन्नाचे प्रमाण ऑगस्ट महिन्यात कमी असते.

GST: ‘जीएसटी’चे पैसे वाढतात कसे?
- चंद्रशेखर टिळक
(ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ)
ऑगस्ट महिना हा नेहमीच करापासूनच्या उत्पन्नासाठी मंदीचा महिना समजला होता. कारण एकंदरीतच सर्वसामान्य नागरिकांचे खर्चाचे आणि उत्पन्नाचे प्रमाण ऑगस्ट महिन्यात कमी असते. शैक्षिणक वर्ष सुरू होऊन एक-दोन त्यामुळे प्रत्यक्ष काय किंवा अप्रत्यक्ष काय, कोणताही करापासूनचे उत्पन्न ऑगस्ट महिन्यात कमी असते;
पण यंदाचा ऑगस्ट या इतिहासाला अपवाद ठरला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२३ या महिन्यात सरकारला १.६३ लाख कोटी रुपये वस्तू-सेवा कर म्हणजेच गुड्स ॲण्ड सर्व्हिसेस टॅक्सपासून मिळाले आहेत. ही आजपर्यंत एका महिन्यात सरकारला या करापासून मिळालेली सर्वांत जास्त रक्कम आहे.
अर्थात अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम या महिन्यात या करापासून जमा झाली ही आनंदाचीच गोष्ट आहे; पण त्याचबरोबर अशी अनपेक्षित आनंदाची बाब पुन्हा पुन्हा होईल का, याचाही विचार झाला पाहिजे. कारण तसे पुन्हा पुन्हा होणार असेल तर सरकारला आणि आपल्यालाही याबाबत आपला विचार बदलावा लागेल आणि असे होणार नसेल तर ते कसे होईल याचा विचार झाला पाहिजे.
कारण जितका कर-महसूल जास्त वाढेल तितकी जास्त तूट आणि पर्यायाने महागाई आवाक्यात राहील. गंमत म्हणजे, जीएसटीपासूनचे उत्पन्न ऑगस्ट महिन्यात अनपेक्षित वाढ दाखविण्याचे एक महत्त्वाचे कारण ही आणि अशी वाढलेली महागाई हेच आहे. महागाईमुळे वस्तू आणि सेवा यांचे भाव वाढतात. हा कर या भावांचे काही विशिष्ट टक्के असा आकारला जातो. त्यामुळे अगदी कराचे दर तेवढेच ठेवले तरी भाव वाढले की, आपोआप या करापासून मिळणारे उत्पन्न वाढते. महागाई कमी झाली; पर्यायाने भाव कमी झाले की, या करापासून मिळणारे उत्पन्न कमी होते.
ऑगस्टमधे जीएसटीपासूनचे उत्पन्न वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे या कर आकारणी आणि कर गोळा करण्याच्या प्रक्रियेत असणाऱ्या काही तांत्रिक व काही प्रशासकीय त्रुटी आता कमी करण्यात आल्या आहेत. जीएसटी कौन्सिलच्या मीटिंगमध्ये सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश, तसेच केंद्र सरकार यांच्यात झालेल्या सविस्तर चर्चेत याबाबत सहमती झाल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. हा मुद्दा मात्र दीर्घकाळ टिकणारा आहे.