घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:58 IST2025-10-13T13:57:57+5:302025-10-13T13:58:06+5:30
बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनची १०९९ कोटींची लघुतम निविदा; ३१.३ हेक्टर जागेवर इमारती उभारणार

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन
अमर शैला -
मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ‘पॅकेज ए’मधील इमारतींच्या बांधकामासाठी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीने १०९९ कोटी रुपयांची लघुतम निविदा दाखल केली आहे. या कंपनीला लवकर कंत्राट दिले जाणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील दोन पुनर्वसन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे भूमिपूजन मंगळवारी, १४ ऑक्टोबरला केले जाण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने त्याची तयारी सुरू केली आहे.
एसआरए आणि एमएमआरडीए संयुक्त भागीदारीत रमाबाई आंबेडकरनगर येथील ३१.८३ हेक्टर जागेचा पुनर्विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पातील ६.९५ हेक्टर क्षेत्रफळाचा विकास केला जाणार आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात या प्रकल्पात ४,०५३ झोपडपट्टीधारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत.
प्रकल्पाच्या कामासाठी यापूर्वीच वास्तुविशारदाची नेमणूक एमएमआरडीएने केली आहे. आता झोपडपट्टीधारकांसाठी इमारती उभारणीचे कामही लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती अंतिम टप्प्यात असून, आता केवळ शिक्कामोर्तब करणे बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीने १०९९ कोटी रुपयांची लघुतम निविदा भरली. तर एनसीसी लिमिटेड या कंपनीने १२९८ कोटी रुपयांची निविदा भरली होती.
तात्पुरते स्थलांतरण
एमएमआरडीएने रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर येथील १६,६७५ झोपडपट्टीधारकांना पात्र ठरविले आहे. यातील पहिल्या टप्प्यात सुमारे ४५०० रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण केले जाईल.
कसा होणार पुनर्विकास?
प्रकल्पाचे काम चार क्लस्टरमध्ये केले जाणार आहे. पहिल्या क्लस्टरमध्ये ४०५३ झोपड्या असून, या भागाचा पुनर्विकास प्रथम केला जाणार आहे. झोपडडीधारकांसाठी ४०५३ घरे उभारणार
दुसऱ्या क्लस्टरमध्ये ८,५३९ झोपड्या, तिसऱ्या क्लस्टरमध्ये ९८१ झोपड्या व चौथ्या क्लस्टरमध्ये ६८५ झोपड्या आहेत. प्रभातनगर १६९ व सार्वजनिक प्रयोजन २७ झोपड्यांचा समावेश आहे.