Join us  

मुंबईत ‘हरित फटाके’ मिळेनात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:23 AM

दिवाळीत कमी प्रमाणात फटाके फोडले जावे, यासाठी जनजागृती केली जाते, परंतु आता पर्यावरणपूरक (हरित) फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई : दिवाळीत कमी प्रमाणात फटाके फोडले जावे, यासाठी जनजागृती केली जाते, परंतु आता पर्यावरणपूरक (हरित) फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मुंबई शहर आणि उपनगरात हरित फटाके अजूनही दाखल झालेले नाहीत. शोधूनही हरित फटाके सापडत नसल्याची खंत मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅशनल इन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) यांनी हरित फटाके बाजारात आणण्याचे काम केले आहे. दिल्लीमध्ये हरित फटाके वाजविणे अनिवार्य आहे. हरित फटाक्यांच्या बॉक्सवर क्यूआर कोड दिलेला असतो.

त्यानुसार, त्यामध्ये कोणते रासायनिक घटक आहेत ते समजते. हरित फटाक्यांमधून बेरियम हा रासायनिक घटक हद्दपार करण्यात आला आहे. मात्र, या फटाक्यांमध्ये कोबाल्ट, निकेल, अल्युमिनियम हे रासायनिक घटक असतात. १२५ डेसिबलपेक्षा कमी तीव्रतेचा फटाका फोडला पाहिजे. मुंबईत हरित फटाक्यांची जनजागृती होणे गरजेचे आहे.

राधाकृष्ण शिंदे फटाका दुकानाचे मालक विलास शिंदे म्हणाले की, बाजारामध्ये हरित फटाके अजून आले नाहीत. हरित फटाके बनविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या वर्षी फटाके विक्रेते जो जुना माल शिल्लक आहे, तोच विकत आहेत. लहान मुलांच्या फॅन्सी फटाक्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. कलर पाऊस, आठ वेळा फिरणारे चक्र, सायरन फटाका, बटरफ्लाय फटाका, पावसामध्ये पाच कलर आणि चक्र असे नवीन फटाके या वर्षी बाजारात उपलब्ध आहेत.

शाळा, रुग्णालये व न्यायालयांच्या परिसरात बंदी च्निरीने सांगितल्याप्रमाणे, हरित फटाके तयार करण्यासाठी १६५ फटाके निर्मात्यांची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच ५ आॅक्टोबरपर्यंत आणखी ६५ फटाके निर्मात्यांना या प्रक्रियेत आणण्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु अद्यापही मुंबईमध्ये हरित फटाके दिसून येत नाहीत.फटाक्यांचा आवाज १२५ डेसिबलपेक्षा कमी, फटाक्यांमधले रासायनिक घटक आणि उत्पादक यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम ‘पेट्रोलियन अँड एक्स्पोजिव्ह सेफ्टी आॅर्गनायझेशन’ (पेसो) या विभागाचे आहे.

शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, धार्मिक स्थळे, न्यायालये येथे १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यावर बंदी आहे, तसेच रात्री १० वाजेनंतर फटाके फोडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असतील. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत असेल, तर त्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात देऊ शकता.

क्यूआर कोड ठरला फोलहरित फटाक्यांच्या बॉक्सवर क्यूआर कोड दिला असून, त्या फटाक्यात कोणकोणते रासायनिक घटक आहेत, त्याची माहिती मोबाइलवर उपलब्ध होते. परंतु क्यूआर कोड सर्च केल्यावर कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :दिवाळीफटाकेपर्यावरण