महाराष्ट्र दर्शनासाठी पोलिसांना अनुदान

By Admin | Updated: September 26, 2016 03:16 IST2016-09-26T03:16:00+5:302016-09-26T03:16:00+5:30

कामाच्या अतिरिक्त ताणामुळे सध्या चर्चेत असलेल्या राज्यातील सुमारे दोन लाखांवर पोलीस अंमलदारांसाठी एक खूशखबर आहे.

Grant to Police for Maharashtra Darshan | महाराष्ट्र दर्शनासाठी पोलिसांना अनुदान

महाराष्ट्र दर्शनासाठी पोलिसांना अनुदान

जमीर काझी, मुंबई
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे सध्या चर्चेत असलेल्या राज्यातील सुमारे दोन लाखांवर पोलीस अंमलदारांसाठी एक खूशखबर आहे. महाराष्ट्र दर्शनासाठी मिळणाऱ्या मंजूर प्रवास सवलतीवेळी त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रवास खर्चासाठीची ही रक्कम त्यांना पोलीस कल्याण निधीतून (वेल्फेअर फंड) वितरित केली जाणार आहे. कॉन्स्टेबल ते सहायक फौजदार दर्जापर्यंतच्या अंमलदारांसाठी ही एकरकमी मदत दिली जाणार आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त/अधीक्षक व घटकप्रमुखांना केलेले आहेत.
पोलिसांच्या गुणवंत पाल्यांना उच्चशिक्षणासाठी २५ हजारांची शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दोन टप्प्यांत बिनव्याजी एक लाख रुपये देण्याचा निर्णय महासंचालकांनी नुकताच घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर समाजात कायदा व सुव्यस्था कायम राहण्यासाठी सदैव बंदोबस्त व अतिरिक्त कामाच्या ताणामुळे सदैव मानसिक तणावाखाली राहणाऱ्या पोलिसांना प्रवास रजेच्या कालावधीत कुटुंबीयांसमवेत फिरताना थोडी-फार मदत मिळावी, या हेतूने हा निधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांना दर चार वर्षांतून महाराष्ट्र दर्शन प्रवासासाठी आठवडाभराची रजा देण्याची तरतूद आहे. या कालावधीत त्यांना एसटी बस प्रवास आणि मुक्काम केलेल्या हॉटेल, निवासाचे शुल्क दिले जाते. त्यासाठी त्यांना ही सवलत उपभोगल्यानंतर, त्याची बिले कार्यालयात जमा करावी लागतात.
आता मात्र, महाराष्ट्र दर्शन प्रवासासाठीची रजा मंजूर झाल्यानंतर त्यांना तातडीने ते कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस घटक वेल्फेअर फंडातून एक हजार रुपये दिले जातील. प्रवास कालावधीत त्यांना मदत म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे. प्रवासानंतर संबंधित अंमलदाराने त्याचा अहवाल घटक प्रमुखांना द्यावयाचा आहे. त्यानंतर, घटकप्रमुखांनी दर महिन्याला या योजनेंतर्गत किती पोलिसांना निधीचे वाटप केले, याचा सविस्तर अहवाल राज्य पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात पाठवावयाचा आहे.
ज्या पोलीस घटकातील वेल्फेअर फंडात निधीची कमतरता आहे, त्यांनी त्याबाबत तातडीने नावानिशी त्यासंबंधी प्रस्ताव मुंबईतील मध्यवर्ती पोलीस कल्याण निधीकडे पाठवावयाचा आहे. त्याप्रमाणे,
त्यांना निधी वितरित केला जाणार आहे.

Web Title: Grant to Police for Maharashtra Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.