Join us

कर्करोगग्रस्त आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं; गोरेगावातील मन सुन्न करणारा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:39 IST

गोरेगावमध्ये एका वृद्ध आजीला तिच्या नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईतून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गोरेगावमध्ये एका आजीसोबत घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झालं आहे. त्वचेचा कर्करोग असलेल्या आजीला तिच्या स्वतःच्या नातावाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची दुःखद घटना घडली आहे. यशोदा गायकवाड असं या ६० वर्षांच्या आजीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. कूपर रुग्णालयात वृद्ध महिलेवर सध्या उपचार सुरु आहेत.

आजी आजोबांसाठी त्यांची नातवंडे सर्वकाही असतात. आपलं म्हातारपण नातवंडांसोबत जावं अशीच त्यांची इच्छा असते. मात्र गोरेगावात एका नातवाने त्याच्या आजीसोबत केलेल्या कृत्याने अनेकांना धक्का बसला. नातवाने केलेल्या कृत्याने माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. यशोदा गायकवाड यांच्या नातवाने त्यांना आजारपणामुळे थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिले. या प्रकारानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्या सध्या उपचार घेत आहेत.

रविवारी आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर आरे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी ६० वर्षीय यशोदा गायकवाड या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असहाय्य अवस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर, गाल आणि नाकावर जखमा दिसत होत्या. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी आपलं नाव सांगितले. त्या त्यांच्या नातवंडासोबत मालाड परिसरात राहत असल्याचे गायकवाड यांनीच पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांचा शोध सुरु केला.

गायकवाड यांची अवस्था फारच बिकट असल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ पोलीस व्हॅनमधून जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले होते. मात्र तिथे सुविधांचा अभाव असल्याने रुग्णालयाने त्यांना दुसरीकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कूपर रुग्णालयात आणलं. आठ तासांनंतर संध्याकाळी ५.३०च्या सुमारास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गायकवाड यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पाहिले असता घराला कुलूप होते. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने नातवाने आजीपासून सुटका करुन घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. मात्र यशोदा गायकवाड यांचे कुटुंबिय सापडल्यानंतरच माहिती समोर येणार आहे.  

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीसआरे