मुंबई - गिफ्ट डीड करून दिलेला फ्लॅट परत घेण्यासाठी न्यायालयात गेल्यामुळे वांद्रे परिसरात एका वृद्ध दाम्पत्याचा मुलगा, नातवाने छळ केल्याची, तर विक्रोळीत वृद्ध सासूला मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वांद्रेसह विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.
तक्रारदार नंदा अगिचा (७९) या गेल्या ३० वर्षांपासून पतीसोबत वांद्रे येथील एका इमारतीत राहत आहेत. सात मजली या इमारतीतील ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहत होते. २०१७ मध्ये नातवाला फ्लॅट गिफ्ट डीडद्वारे दिल्यानंतर काही काळ सर्वजण व्यवस्थित वागत होते. मात्र, २०२० नंतर मुलगा, सून आणि नातवाने त्रास द्याला सुरुवात केली.
न्यायालयात दावा नंदा यांनी २०२४ मध्ये सीनियर सिटीझन कोर्टात गिफ्ट डीड रद्द करण्यासाठी दावा दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने अंतरिम आदेश दिला. याच रागातून मुलगा व नातवाने त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सोसायटी मेंटेनन्स न भरल्यामुळे इमारतीतील लिफ्ट सेवा बंद झाली. काही दिवस दोन्ही लिफ्ट बंद राहिल्याने वृद्ध दाम्पत्याला हॉस्पिटललाही जाता आले नाही.
मानसिक त्रासाचा आरोप हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, डोअरबेल बंद करणे, घरातच कपडे वाळत टांगणे अशा प्रकारांनीही मानसिक त्रास दिल्याचा आरोप वृद्ध दाम्पत्याने केला आहे. त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी मुलगा, सून आणि नातवाविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.दरम्यान, विक्रोळी परिसरातील ७६ वर्षीय महिलेला मुलाच्या निधनानंतर सुनेने घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. त्यानुसार विक्रोळी पोलिसांनी सुने विरोधात गुन्हा नोंदवला आहे. वृद्ध महिला दोन मुले आणि सुनेसोबत विक्रोळीत राहायच्या. मुलाच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने छळ सुरू केल्याचा आरोप महिलेने केला आहे. मारहाण करणे, उपाशी ठेवून मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. अशाप्रकारे मानसिक आणि शारीरिक जाच केला जात असल्याने महिलेच्या लहान मुलाने घरात कॅमेरे लावले. मात्र, सुनेने ते काढून टाकले. लहान मुलगा पुणे येथे कामानिमित्त गेला असताना सुनेने तिला घराबाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले.
Web Summary : Mumbai: Elderly couple harassed for flat; daughter-in-law evicts mother-in-law post son's death. Police investigations are underway following complaints of torment and abuse filed in Bandra and Vikhroli, respectively.
Web Summary : मुंबई: फ्लैट के लिए बुजुर्ग दंपति प्रताड़ित; बेटे की मौत के बाद बहू ने सास को निकाला। बांद्रा और विक्रोली में उत्पीड़न की शिकायत के बाद पुलिस जांच जारी है।