लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांचे बजेटही लाखोंच्या घरात; ३ ते १० लाखांपर्यंत प्रत्येक पथकाचा ताळेबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:31 IST2025-08-08T12:31:05+5:302025-08-08T12:31:20+5:30
सरावापासूनच टी-शर्ट, जेवण, वाहतुकीवर मोठा खर्च

लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांचे बजेटही लाखोंच्या घरात; ३ ते १० लाखांपर्यंत प्रत्येक पथकाचा ताळेबंद
सचिन लुंगसे -
मुंबई : गुरुपौर्णिमेला सुरू झालेला गोविंदा पथकांचा सराव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकासह माझगाव ताडवाडी व यंग उमरखाडी गोविंदा पथक मानवी मनोरे रचण्यास सज्ज होत आहेत. सराव सुरू असतानाच गोविंदा पथकांनी स्वत:चा आर्थिक डोलारादेखील तेवढ्याच शिस्तबद्धरीत्या सांभाळला आहे. या पथकांचा दरवर्षीचा आर्थिक ताळेबंद तीन ते दहा लाख रुपयांपर्यंत जात असल्याचे आता समोर आले आहे.
मुंबईत १५० हून अधिक नामांकित गोविंदा पथक असून, जोगेश्वरीत या पथकांची संख्या सुमारे ६७ आहे. येथील जय जवान गोविंदा पथकाने गुरुपौर्णिमेच्या एक महिना अगोदरपासूनच सुरू केला आहे.
माझगाव-ताडीवाडी गोविंदा पथकानेही तेव्हाच सराव सुरू केला आहे. सरावापासूनच गोविंदांचे टी-शर्ट, त्यांचे जेवण, मेडीक्लेम, मेडिकल, वाहतूक यांसारख्या बाबींवर मोठा खर्च पथकांकडून केला जातो.
हा खर्च गोविंदा मंडळाला सहज परवडणारा नसतो. त्यासाठी राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांकडून आर्थिक मदत घेतली जाते. नेतेदेखील त्या मोबदल्यात स्वत:चे फोटो, नाव असलेले टी-शर्ट गोविंदांना देतात. प्रो-गोविंदासाठीचा खर्च हा बहुसंख्य कॉर्पोरेट कंपन्यांकडून
केला जातो.
सरावापासून दहीहंडीपर्यंत किती बजेट?
पथकाचे स्वरूप एकूण खर्च सदस्य संख्या
छोटे ३ ते ४ लाख ३००
मध्यम ५ ते ६ लाख ५०० ते ६००
मोठे ८ ते १० लाख १५०० ते २०००
सरावात जेवणाचा खर्च ४० हजार
‘जय जवान’च्या सरावासाठी विरारसह आसपासच्या परिसरातून गोविंदा येतात. त्यांच्या जेवणासाठी १५ ते २० दिवसांचा एकूण ३० ते ४० हजार खर्च होतो.
नाश्ता, जेवणासाठी सुमारे १ लाख
दहीहंडीच्या गोविंदांना सकाळी नाश्त्यासाठी सफरचंद, केळी, दूध दिले जाते. दुपारी जेवण म्हणून मिसळ-पाव दिला जातो. रात्रीचे जेवण म्हणून पुलाव दिला जातो. या सगळ्यांवर किमान १ ते १ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च होतो.
विम्याचा क्लेम १० लाख
प्रत्येक गोविंदा पथकाकडून सदस्याचा विमा काढला जातो. या विम्याची प्रत्येकी रक्कम ७० रुपये असून विमा संरक्षण १० लाखांचे असते.
ट्रकसाठी किमान १० हजार
एक ट्रक किंवा बससाठी हंडीदिवशी १० हजार रुपये एवढे भाडे मोजले जाते. जय जवान गोविंदा पथकातील सदस्य सहा बसेस, दोन ट्रक आणि दोनशे ते अडीचशे दुचाकी घेऊन प्रवास करतात.
दीड ते दोन हजार गोविंदा
एकूण गोविंदांच्या संख्येवर पथकाचे बजेट ठरत असते. जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकात सुमारे दोन हजार गोविंदा आहेत. माझगाव ताडवाडी, दादर सार्वजनिक, परळचे गोपाळ, ठाण्याचे जयश्री गोविंदा यांसारख्या पथकांतील गोविंदांची संख्या सुमारे दीड ते दोन हजार आहे. मोठ्या गोविंदा पथकांसाठीच्या टी-शर्टवर किमान तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च केला जातो.
गोविंदा सणांपुरता मर्यादित नाही
मुंबई किंवा राज्यात आपत्कालीन घटनांमध्ये गोविंदा पथक आर्थिक-मानसिक मदतीचा हातही देतात. त्यामुळे गोविंदा हा केवळ सणांपुरता मर्यादित राहत नाही.
महेश सांवत, संस्थापक सभासद, जय जवान पथक, जोगेश्वरी