Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांची जीभ वारंवार घसरते, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदींकडे केली मोठी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:11 IST

Sambhaji Raje Chhatrapati: विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी व्यावसायिकांवरून मुंबईबाबत केलेल्या विधानाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान, कोल्हापूर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

राज्यपालांच्या विधानावर टीका करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, अशी टीका संभाजी राजे यांनी केली.

त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. 

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीभगत सिंह कोश्यारीमहाराष्ट्र