राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन, अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता
By Ravalnath.patil | Updated: November 9, 2020 13:51 IST2020-11-09T13:44:44+5:302020-11-09T13:51:14+5:30
Maharashtra Governor BS Koshyari spoke to State Home Minister Anil Deshmukh : अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे.

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन, अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे.
सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. तसेच, अर्णब गोस्वामींच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशीही सूचना भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांना केली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.
Maharashtra Governor BS Koshyari spoke to State Home Minister Anil Deshmukh & conveyed to him his concern over the security and health of Republic TV Editor Arnab Goswami. He also asked the Home Minister to allow Goswami's family to see him and to speak to him: Raj Bhavan pic.twitter.com/ctTpWdsSIt
— ANI (@ANI) November 9, 2020
दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. तिथून त्यांना रायगडमध्ये नेण्यात आले होते. तिथे न्यायालयात हजर केले असतान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला होता.
अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी
अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची रविवारी अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.