दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना करावी -  सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 07:02 PM2017-08-10T19:02:38+5:302017-08-10T19:04:41+5:30

Government should request Prime Minister Narendra Modi to investigate the murder of Deendayal Upadhyay - Sachin Sawant | दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना करावी -  सचिन सावंत

दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना करावी -  सचिन सावंत

Next

मुंबई दि. 10 - गेली 49 वर्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचे गूढ उलगडले नसल्याने, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी तरी राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार जनसंघाचे अध्यक्ष व आजच्या सत्ताधारी भाजपाचे आदर्श दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने रेल्वे स्टेशनचे नामकरण करणे तथा त्यांचे पुतळे उभारण्याचे कार्यक्रम ठिकठिकाणच्या भाजपा सरकारनी हाती घेतले आहेत. राज्याच्या विधिमंडळात त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा होत आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या हत्येचे गूढ अजूनही उलगडलेले नसणे हे दुर्देवाचे आहे. गेल्या तीन वर्षापासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. या तीन वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूची चर्चा आणि चौकशी करण्यात या सरकारने रस दाखवला. परंतु अपेक्षा होती की, संघ आणि भाजपासाठी महत्त्वाचे असणा-या उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी देखील होईल. परंतु दुर्देवाने वाजपेयी सरकारच्या 6 वर्षाच्या कालखंडाप्रमाणे मोदी सरकारने त्यासंबंधी कोणतेही पाऊल उचलले नाही. 
जनसंघाचे पूर्व अध्यक्ष बलराज मधोक यांना या हत्येसंबंधी बरीच माहिती होती असे समजते. त्यांनी ही माहिती उघड केल्यानंतर पुन्हा चौकशी झालेली नाही. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नातेवाईक व भाजपा नेत्या मधू शर्मा यांनीही उपाध्याय यांच्या हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करायला कोणतीही हरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य सरकारतर्फे चौकशीची विनंती करावी असे सावंत म्हणाले.  
 

Web Title: Government should request Prime Minister Narendra Modi to investigate the murder of Deendayal Upadhyay - Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.