Join us

कर्ज हमी घेऊन सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:23 IST

पीएम फंडातून ५० हजार कोटींची मदत द्या!

मुंबई : राज्यातील काही साखर कारखानदारांच्या कर्ज थकबाकीची हमी सरकारने घेतली, त्याच धर्तीवर पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन त्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून कालबद्ध स्वरूपात वाटप करावे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून महाराष्ट्रासाठी किमान ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्याचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी करून ते म्हणाले, भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. कोरोना काळाच्या बिकट परिस्थितीतही आम्ही कर्जमुक्ती दिली होती, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सापळ्यात अडकणार नाही

कोविड फंडातले ६०० कोटी ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाहीत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, भाजपच्या आमदार-खासदारांनी सगळे पैसे त्यावेळी पीएम केअर फंडासाठी दिले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीवर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही काय केले? आम्ही काय केले? यावर चर्चा करायला तयार आहे. दरवेळी काही अंगलट आल्यावर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची सवय असून, त्यांच्या सापळ्यात अडकणार नाही.

हीच का तुमची देशभक्ती? 

लडाखमधील हवामान बदलासाठी संशोधन करणारे सोनम वांगचूक यांना रासुकाअंतर्गत अटक करण्यात आली.  ज्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळताय आणि देशासाठी काम करणाऱ्याला अटक करता? हीच का तुमची देशभक्ती? असा सवाल उपस्थित करत आगामी सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Government should guarantee loans, free farmers from debt: Uddhav Thackeray

Web Summary : Uddhav Thackeray demands loan waivers for flood-hit farmers, similar to sugar factories. He urged immediate aid of ₹50,000 per hectare and ₹50,000 crore from PM CARES for Maharashtra. He criticized the government's handling of funds and questioned their patriotism, citing the arrest of Sonam Wangchuk and cricket ties with Pakistan.
टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना