"The government is not serious about Maratha reservation. Why was there no lawyer for the hearing?", chandrakant patil | 'मराठा आरक्षणासाठी सरकार बिल्कुल गंभीर नाही, सुनावणीला वकील का नव्हते?'

'मराठा आरक्षणासाठी सरकार बिल्कुल गंभीर नाही, सुनावणीला वकील का नव्हते?'

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी दिल्लीत मंत्री अशोक चव्हाण का उपस्थित नव्हते, असा सवाल उपस्थित केला. तसेच, सरकार बिल्कुल गंभीर नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. 

नवी दिल्ली - मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. न्यायालयानं आज मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. मात्र, त्यानंतर ती चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. खंडपीठासमोरील आजच्या सुनावणीला सरकारी वकील मुकूल रोहतगी गैरहजर होते. यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी दिल्लीत मंत्री अशोक चव्हाण का उपस्थित नव्हते, असा सवाल उपस्थित केला. तसेच, सरकार बिल्कुल गंभीर नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. 

9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तेव्हापासून आजतागायत सरकारने केलेले प्रयत्न संशयास्पद आहेत. अॅड. थोरात यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी लवकर चालवण्यासाठी कोर्टात मेन्शन केलं, पण सर्वोच्च न्यायालयानं ते फेटाळलं. त्यामुळे, गेल्या 47 दिवसांतील राज्य सरकारच्या कामाच्या अनुभवावरुन मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या निर्णयाविरुद्ध केलेल्या अर्जावर सुनावणी आज होणार होती. मात्र, या सुनावणीसाठी दिल्लीत ना सरकारी वकील हजर होते, ना राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण दिसले, असे पाटील यांनी म्हटले.    

सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणार का, याकडे समाजासह राज्याचं लक्ष लागलं होतं. ही सुनावणी सकाळी सुरू झाली, त्यावेळी सरकारी वकील मुकूल रोहतगी उपस्थित नव्हते. त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली होती. रोहतगी यांच्या अनुपस्थितीबद्दल मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे सरकार याबद्दल गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

उद्धव ठाकरेंचं भाषण दसऱ्याचं नसून शिमग्याचं

दसरा मेळाव्याचं भाषण हे दसऱ्याचं नसून शिमग्याचं होतं. उद्धव ठाकरेंची ती संस्कृती नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ते शोभत नाही. शिमग्याला जसं आपण विरोधकांच्या नावानं बोंब मारली जाते, तसंच हे भाषण होतं, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जबरी टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणात, मराठा आरक्षणावर, राज्यातील कोरोना परिस्थितीवर किंवा राज्यातील शिक्षणासंदर्भात काहीही भाषण केलं नाही. राज्यातील शाळा कधी सुरू होतील, यावरही ते काहीही बोलले नाहीत. शाळा सुरू होण्याबद्दल काहीच माहिती नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे, असेही पाटील यांनी म्हटलं. तुम्ही ज्याप्रकरची शिवराळ भाषा वापरली, भाजपा नेत्यांपासून ते मोदींपर्यंत टीका केली, गोमुत्र, शेण, हिंदुत्व यावर बोलले, मग एक चापट मारल्यावर दुसरा गाल पुढे करणारे आम्हीही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.  

विनोद पाटील यांचीही सरकारवर नाराजी

''मराठा आरक्षणाच्या आजच्या सुनावणीला राज्य सरकारचे वकील मुकूल रोहतगी अनुपस्थित राहिले. राज्य सरकारची ही चूक झाली आहे. राज्य सरकारने वकिलांना सूचना करायला हवी होती. कदाचित सरकारला गांभीर्य नसेल, म्हणूनच सरकारचे वकील अनुपस्थित होते. आमचे वकील सुनावणीला हजरं होते. त्यामुळे, आमच्या वकिलांनीच सरकारची बाजू ऐकण्याची विनंती खंडपीठाला केला. त्यामुळे, न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली. मात्र, सरकार अद्यापही गंभीर नसल्याचे दिसत आहे, असा आरोप मराठा आरक्षणातील प्रमुख याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकिलांची अनुपस्थिती असल्याने सुनावणी पुढे ढकलली आहे. आजचं प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागलेलं आहे. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेले असून त्यासाठी न्यायमूर्तीचं खंडपीठ गठीत करण्यात आलं नाही. म्हणून, ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे घेण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर हे प्रकरणासाठी 5 न्यायमूर्तीचं खंडपठ गठीत होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असेही विनोद पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. 

संभाजीराजेंची सरकारला विनंतीवजा सूचना

मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे, मी सरकारला नेहमी सांगितलं आहे. जे कोणी सामान्य विभागाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचे आहे. त्यामुळे सरकाराला माझी विनंती पूर्वक सूचना आहे की ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा, अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे 'टीव्ही ९ मराठी' या वृत्तावाहिनीशी बोलताना म्हणाले की, मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत.  मी आता बोलून बोलून थकलो आहे. पूर्णपणे थकून गेलो आहे. सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत. एवढीच विनंती असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले

वकिलाची अनुपस्थिती, संभाजीराजेंची नाराजी

सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्देव आहे. गंभीर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जिथे कुठे असतील, त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करण्याची गरज आहे, अशं संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे यांच्या या विनंतीनंतर अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारनं आणखी जोर लावायला पाहिजे म्हणजे काय करायचं?, असा सवाल उपस्थित केला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "The government is not serious about Maratha reservation. Why was there no lawyer for the hearing?", chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.