Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकार माहुलवासीयांचा खून करतेय - बिलाल खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 01:01 IST

माहुलवासीयांना राहण्यायोग्य जागा मिळावी, यासाठी न्यायालयाने सरकारला घर देण्याचे आदेश दिले आहेत.

- कुलदीप घायवटमाहुलवासीयांना राहण्यायोग्य जागा मिळावी, यासाठी न्यायालयाने सरकारला घर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात नाहीत. माहुलवासीयांना प्रदूषित ठिकाणी मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याला जबाबदार सरकार असल्याने सरकारद्वारे माहुलवासीयांचा खून होत असल्याची भूमिका ‘घर बचावो, घर बनाओ’चे कार्यकर्ते बिलाल खान यांनी व्यक्त केली.माहुलवासीयांना न्यायालयाकडून न्याय मिळाला का?माहुलवासीयांना न्यायालयाकडून न्याय मिळाला. माहुलवासीयांना सुरक्षित ठिकाणी जागा द्यावी, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. मात्र सरकारकडून जागा नसल्याचे कारण दिले जात आहे. सरकारच्या विविध योजनांमध्ये मुंबईत तब्बल ७० हजार ते १ लाख घरे आहेत. २०१५ पासून माहुलमधील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत सरकारला जागे करण्यासाठी ९ महिन्यांपासून ‘जीवन बचाओ’ आंदोलन सुरू आहे.माहुलमध्ये रहिवाशांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत?माहुल परिसर मानवासाठी राहण्यायोग्य नाही. येथे इंडस्ट्रीयल परिसर असल्याने कंपन्यांचा धूर, सांडपाणी सोडले जाते. परिणामी, नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. माहुलमधील घरांमध्ये हवा खेळती नाही, सूर्यप्रकाश घरात येत नाही. माहुलमध्ये राहत असलेल्या रहिवाशांना क्षयरोग होत आहे. एका कुटुंबामधील किमान एका सदस्याला क्षयरोग झालेला आहे. त्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे क्षयरोगाचा झपाट्याने प्रसार होत आहे. यासह त्वचारोग, पोटाचे विकार, फुप्फुसाचा दाह, श्वसनाचे रोगही होत आहेत.माहुलमध्ये ३० हजार नागरिकांच्या जीवाला धोका आहे. मागील दोन वर्षांत ५०० पेक्षा जास्त नागरिक आजारी पडले. १५ पेक्षा जास्त उद्योगांच्या माध्यमातून रसायने पाण्यात आणि हवेत मिसळत आहेत. शुद्ध हवा, पाणी आणि सुरक्षित जीवन मिळावे, अशी माहुलवासीयांची इच्छा आहे.अंधेरी, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वांत प्रदूषित?मुंबईमध्ये अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, माझगाव, कुलाबा येथे धूलिकणांचे प्रमाण अधिक असल्याची नोंद होते. मात्र येथील हवा खेळती असल्याने धूलिकणांचे प्रमाण कमी-जास्त होते. याच्या उलट माहुल येथे खेळती हवा नसल्याने अपायकारक वायूमुळे अनेक व्याधी होतात. इंडस्ट्रीयल परिसरात राहणे धोक्याचे असल्याने माहुल हे अधिक प्रदूषित आहे.

टॅग्स :प्रदूषण