Join us  

सरकारी रुग्णालये अग्निपरीक्षेच्या तोंडावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 5:42 AM

फायर ऑडिटचे तीनतेरा; जबाबदारीची एकमेकांवर ढकलाढकली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडाला अग्निशमन यंत्रणेचे अपयश जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील जिल्हा शासकीय व महापालिका रुग्णालयांमध्येही अग्निशमन यंत्रणेची स्थिती चांगली नाही. दर दोन वर्षांनी फायर ऑडिट होणे गरजेचे असताना, अनेक रुग्णालयांमध्ये चारचार-पाचपाच वर्षांमध्ये फायर ऑडिट झालेच नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. फायर व इलेक्ट्रिक ऑडिटबाबत यंत्रणेबाबतच्या उदासीनमुळे राज्यभरातील सरकारी रुग्णालयेही अग्निपरीक्षेच्या तोंडावर आहेत.   

राज्यातील महापालिकेच्या काही रुग्णालयांचे फायर ऑडिट गेल्या वर्षाच्या अखेरीस झाले आहे, तर अनेक ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही फायर ऑडिट झालेले नसल्याचे पाहायला मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सरकार आणि महापालिका प्रशासन यांनी बेजबाबदार रुग्णांलयावर कारवाई करण्याची गरज असताना, त्याकडे साफ कानाडोळा केला जातो. अनेक रुग्णालयांमध्ये फायर एक्स्टिंग्विशर अडकविली आहेत, पण त्यांच्या मुदतबाह्यतेची खातरजमा होत नाही, अशी स्थिती आहे. कर्मचारी व सुरक्षारक्षकांची अग्नीशमन प्रात्यक्षिकेही होत नाहीत. जुन्या इमारतीत विद्युत वायरिंग अनेक ठिकाणी निघाली आहेत. अनेक महापालिकांच्या रुग्णालयांत इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. 

मुंबई : सगळेच नियम धाब्यावरमुंबईमधील रुग्णालये फुल प्रूफ फायर ऑडिट विना आहेत. मुंबईत राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, येथील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच रुग्णालये सोडली, तर बहुतांशी रुग्णालयात फायर ऑडिटपासून अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात आहेत. मुंबईत १६ सर्वसाधारण रुग्णालय, पाच विशेष रुग्णालय, तीन प्रमुख रुग्णालय, १७५ दवाखाने, २०८ आरोग्य केंद्रे आहेत. २०१८ मध्ये पाच प्रमुख रुग्णालय आणि २०४ दवाखान्यांचे फायर ऑडिट झाले आहे. त्यानंतर, २०१९ आणि २०२० मध्ये ऑडिटचे आदेश देण्यात आले होते. सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. इलेक्ट्रिक ऑडिट किती रुग्णालयांत झाले आहे, याची माहितीच उपलब्ध नाही. 

पुणे : अग्निशमन यंत्रणा ‘रुग्णालय’ भरोसे n रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे हमीपत्र जमा केल्यावर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. n यंत्रणा तपासून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी रुग्णालय व्यवस्थापनाची असते. त्यामुळे अग्निशमन यंत्रणेची विश्वासार्हता ‘रुग्णालय’ भरोसे असल्याचे आढळून आले आहे. केवळ यंत्रणांकडून तपासणी करून हमीपत्र जमा करायचे असते. 

ठाणे : इलेक्ट्रिक ऑडिटची माहितीच नाही ठाणे : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एक जिल्हा व १० महापालिका रुग्णालये आहेत. सर्व ११ रुग्णालयांत फायर ऑडिट झाले आहे. मात्र, किती रुग्णालयांत इलेक्ट्रिक ऑडिट झाले आहे, याची माहितीच उपलब्ध नाही.

मोठ्या रुग्णालयांमधील फायर ऑडिटची स्थितीविभाग      ऑडिट    न झालेले     झालेलेउ. महाराष्ट्र     ०६    १० मराठवाडा      ६१     १३७ विदर्भ    ०५    १०प. महाराष्ट्र     ०९     माहिती                 उपलब्ध नाहीमुंबई      ०५     २० कोकण      ०९    ००

 

टॅग्स :भंडारा आगसरकारआग