मुंबई :गणेशोत्सव या वर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकांत रोषणाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा होणार आहे. यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.
अॅड. शेलार म्हणाले, गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव होणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि मोठ्या शहरांत सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येईल. ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कलासंकृती दर्शिवलेली आहे अशा चित्रपटांचा विशेष गौरव करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक संचालनालयातर्फे महोत्सवाचे नियोजन करण्यात येईल.
राज्य शासनाचा असा राहणार सहभाग...
महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करणार
राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी भाषिकबहुल काही देशांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देणार
राज्यात गणपतीविषयक रील्स स्पर्धा
विर्सजन सोहळयामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सोयीसुविधा व वाहनव्यवस्था उपलब्ध करणार
मंदिरे आणि गणेशोत्सवाच्या देखाव्यांच्या ऑनलाइन दर्शनासाठी स्वतंत्र पोर्टल. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो, व्हिडीओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी प्लॅटफॉर्म विकसित करणार