ठाण्यातील घोटाळ्याला सरकारची क्लीन चिट; भाजप आमदार संजय केळकर चांगलेच संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 08:42 IST2023-03-15T08:41:54+5:302023-03-15T08:42:34+5:30
घोटाळे झाले नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ठाण्यातील घोटाळ्याला सरकारची क्लीन चिट; भाजप आमदार संजय केळकर चांगलेच संतापले
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाणे शहरातील विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या कामात घोटाळ्यांची चौकशी करण्याच्या मागणीवर भाजपचे आमदार संजय केळकर मंगळवारी विधानसभेत चांगलेच संतापले; पण घोटाळे झाले नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत यांच्या विधानावर केळकर जागा सोडून पुढे आले. त्यांना आणखी काही मुद्दे मांडायचे होते; पण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमती नाकारल्याने केळकर यांची निराशा झाली.
ठाणे शहरातील ही कामे निकृष्ट दर्जाची व अपूर्णावस्थेत आहेत. तरीही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिले अदा करण्यात आली. या विषयीची तक्रार आली आहे काय, अशी विचारणा कालिदास कोळंबकर आणि अन्य सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, असे मंत्री सामंत यांनी सांगताच केळकर म्हणाले की, ठाण्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निधी आणत आहेत; पण विकासाच्या नावाखाली कंत्राटदार आणि अधिकारी संगनमताने पैसे हडप करत आहेत. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, रवींद्र वायकर यांनीही उपप्रश्न विचारले.
...आणि संजय केळकर झाले संतप्त
संबंधित कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ झाले आहे. घोटाळे झालेले नाहीत. तरीही तक्रारीत तथ्य असेल तर कारवाई करू, असे मंत्री सामंत म्हणाले. या उत्तराने संतप्त झालेले केळकर समोर आले आणि मोठमोठ्याने बोलू लागले. मात्र, अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"