गोरेगाव स्टेशनवरील उत्तर दिशेचा फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे तो २ एप्रिलपासून पुढील सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांनी पाडण्यात येत असलेल्या पुलाला लागून असलेल्या समांतर नवीन फूट ओव्हर ब्रिजचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गोरेगाव स्टेशनवरील जुना फूट ओव्हर ब्रिज प्लॅटफॉर्म क्रमांक ३,४,५,६ आणि ७ ला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या योजनांमध्ये त्याचा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून तो अधिक सुरक्षित करण्यासाठी पाडकाम आणि पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पूल बांधल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळेल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.