Join us

गोरखपूर रेल्वे सोडली, पण १२ डबे रिकामेच, साेडलेल्या गाडीची प्रवाशांना माहितीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 06:49 IST

रेल्वेने घाईगडबडीत ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतानाच प्रवाशांना याबाबत पुरेशी माहिती दिली नाही.

मुंबई : वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरखपूर अशी अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. मात्र, अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे गाडीची माहिती प्रवाशांपर्यंत योग्य वेळी पोहोचलीच नाही.  

परिणामी या १५ डब्यांच्या विशेष गाडीमधील केवळ तीन डबे प्रवाशांनी भरले. उर्वरित ट्रेन जवळपास रिकामीच राहिल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रेल्वेने या अनारक्षित गाडीसाठी प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी सीएसएमटीवर मोठा फौजफाटा तैनात केला होता.

रेल्वेने घाईगडबडीत ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतानाच प्रवाशांना याबाबत पुरेशी माहिती दिली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, असे जाणकारांचे मत आहे. प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा आणि सुरक्षेचा हवाला देत रेल्वेच्या निर्णयांमधील अनियमिततेबाबात प्रवाशांमधून असंतोष व्यक्त होत आहे.

दुर्घटनेतील २ जखमींवर ‘केईएम’मध्ये शस्त्रक्रियावांद्रे स्थानकावर रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्या तिघांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी  दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर एकावर येत्या काही दिवसांत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नूर मोहम्मद शेख, इंद्रजित सहानी आणि रामसेवक प्रसाद, अशी या जखमींची नावे आहेत. सहानी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर  रविवारी दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली.  तसेच प्रसाद यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. शेख यांच्यावर काही दिवसांनी  शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. काही जखमींना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :मुंबईरेल्वे