व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणुकीचा गूगलचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:14 IST2020-05-28T23:05:58+5:302020-05-28T23:14:33+5:30
महिनाभरापूर्वीच गूगलची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करीत तेथील ९.९९ टक्के समभाग खरेदी केले आहेत.

व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणुकीचा गूगलचा विचार
मुंबई : भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियाचे ५ टक्के समभाग खरेदी करण्याचा विचार गूगल करीत आहे. महिनाभरापूर्वीच गूगलची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करीत तेथील ९.९९ टक्के समभाग खरेदी केले आहेत. त्या पाठोपाठ गूगलही आता दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.
ब्रिटनमधील व्होडाफोन ग्रुप आणि भारतातील आदित्य बिर्ला ग्रुप यांची संयुक्त कंपनी असलेल्या व्होडाफोन आयडियामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार गूगल करीत असल्याचे सूत्राने सांगितले. या कंपनीतील ५ टक्के समभाग विकत घेण्याची तयारी गूगलने सुरू केली आहे. याशिवाय गूगलने जिओमधील काही समभाग विकत घेण्यासाठीही बोलणी सुरू केली असल्याचे समजते.
व्होडाफोन-आयडिया ही कंपनी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. या कंपनीला दूरसंचार विभागाला एजीआरची रक्कम म्हणून ५८,२५४ कोटी रुपये द्यावयाचे आहेत. त्यापैकी केवळ ६,८५४ कोटी रुपये हे मागील महिन्यात देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम कशी उभी करावयाची यासाठी कंपनी विविध उपाय शोधत आहे. एप्रिल महिन्यात व्होडाफोन ग्रुपने या कंपनीच्या दैनंदिन कामकाजासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून काही रक्कम दिली आहे. यामध्ये एजीआरसाठी द्यावयाच्या रकमेचाही समावेश आहे.