गुड न्यूज! प्रभादेवी पादचारी रेल्वे पूल २५ सप्टेंबरपर्यंत होणार सुरू; नागरिकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 10:54 IST2025-09-21T10:54:27+5:302025-09-21T10:54:55+5:30

प्रभादेवी, परळमध्ये पूर्व-पश्चिम जाणे-येणे होणार सोपे, पुलासाठी पालिकेने खर्च केला असला तरी तो रेल्वेने बांधला आहे. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती कोण करणार?  त्याचे हस्तांतरण पालिकेला करणार की रेल्वेकडेच राहणार याबाबत निर्णय झालेला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले

Good News! Prabhadevi Pedestrian Railway Bridge to be opened by September 25; Citizens will get relief | गुड न्यूज! प्रभादेवी पादचारी रेल्वे पूल २५ सप्टेंबरपर्यंत होणार सुरू; नागरिकांना मिळणार दिलासा

गुड न्यूज! प्रभादेवी पादचारी रेल्वे पूल २५ सप्टेंबरपर्यंत होणार सुरू; नागरिकांना मिळणार दिलासा

महेश कोले

मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वे पूल बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच प्रभादेवी आणि परळमध्ये पूर्व-पश्चिम रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरीवली दिशेच्या अर्धवट पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असून, तो २५ सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. त्यामुळे पूर्व भागातून पश्चिम तसेच पश्चिम भागातून पूर्व भागात जाणे सोपे होणार आहे. 

फिनिशिंगची कामे सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन पूल दोन्ही रेल्वे मार्गावरून जात असून तो प्रभादेवी स्थानकाला थेट जोडणार आहे. तो एलफिन्स्टन रोड ओव्हरब्रिजच्या उत्तरेकडील बाजूला आहे. पश्चिम रेल्वेने त्यांच्या अखत्यारीत भाग पूर्ण केला असून, पूल प्रभादेवी स्थानकातून सुरू होतो. मात्र, मध्य रेल्वेच्या परळ कॉलनीपर्यंत आल्यानंतर पूल अर्धवट होता. त्याचे काम आता पूर्ण झाले आहे.

पादचारी पुलाची देखभाल, दुरुस्ती कोणाकडे?
पुलासाठी पालिकेने खर्च केला असला तरी तो रेल्वेने बांधला आहे. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती कोण करणार?  त्याचे हस्तांतरण पालिकेला करणार की रेल्वेकडेच राहणार याबाबत निर्णय झालेला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. या ठिकाणी रेल्वे हद्दीत आणि चर्चगेट दिशेला आणखी एक पादचारी पूल असून, त्यावरून केवळ प्रवाशांनाच परवानगी आहे.  नव्याने बांधलेल्या पुलावरून प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना परवानगी असेल की नाही याबाबत रेल्वेकडून अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

‘महारेल’ने वेधले लक्ष 
एलफिन्स्टन रेल्वे पूल बंद झाल्यामुळे पूर्व-पश्चिम तसेच प्रभादेवी आणि  परळ, केईएम रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांसाठी सध्या पर्यायी पादचारी मार्ग उपलब्ध नाही. एलफिन्स्टन पुलला किमान तीन वर्षे लागतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन पादचारी पुलामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दोन्ही पुलांवरून प्रवाशांसह इतर नागरिकांनाही परवानगी देण्याची मागणी प्राधिकरण ‘महारेल’ने रेल्वेकडे केली आहे.

नवीन पादचारी पूल लवकरच खुला करण्यात येणार आहे. हा पूल बीएमसीच्या माध्यमातून डिपॉझिट वर्कच्या रूपामध्ये पूर्ण केला गेला आहे. या पुलामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. - डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

पूल खुला करण्याबाबत अद्याप आम्हाला कल्पना नाही. परंतु प्रवासी सुरक्षा आणि सामान्य पादचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन तो सर्वांसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. - अभय सिंह, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

पालिकेने दिला निधी
पुलाच्या बांधकामासाठी मुंबई महानगरपालिकेने रेल्वेला निधी दिला होता. त्या निधीच्या आधारे दोन्ही रेल्वे प्रशासनाने स्वतंत्रपणे त्यांच्या हद्दीतले पूल उभारले. मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील पुलाची लांबी ४२ मीटर तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत सुमारे ३० मीटर आहे. 

Web Title: Good News! Prabhadevi Pedestrian Railway Bridge to be opened by September 25; Citizens will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.