दिलासादायक बातमी, मुंबईत सलग पाच दिवस रुग्ण संख्येत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 20:42 IST2021-04-20T20:42:39+5:302021-04-20T20:42:50+5:30
सलग पाच दिवसांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

दिलासादायक बातमी, मुंबईत सलग पाच दिवस रुग्ण संख्येत घट
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अडीच महिन्यांत दोन लाख ६६ हजार बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र या काळात मृत्यूचा दर ०.०३ टक्के म्हणजेच दररोज सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत आहे. दिल्लीमध्ये हेच प्रमाण दररोज २४० मृत्यू एवढे आहे. तसेच गेल्या सलग पाच दिवसांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
जानेवारी अखेरीपर्यंत मुंबईतील बाधित रुग्णांचा आकडा तीन लाखांपर्यंत पोहोचला होता. त्यानतंर रुग्ण संख्येत मोठी घट झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून कोरोनाचा प्रसार वेगाने वाढला आहे. मार्च महिन्यात रुग्णांची दररोजची संख्या दहा हजारांवर पोहोचली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये रूग्णांचा आकडा स्थिरावला आहे. तर १५ एप्रिलपासून रुग्ण संख्येत घट दिसून येत आहे.
मृत्यू दरात घट...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या ७० दिवसांमध्ये दोन लाख ६६ हजार बाधित रुग्ण वाढले आहेत. तर ९५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये सोमवारी कोरोना मृत्यूचे प्रमाण २४० एवढे होते. तर मुंबईत दरदिवशी ०.०३ टक्के एवढे आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' अशा मोहीम आणि विनामास्क फिरणाऱ्यांकडून २६ लाख रुपये दंड वसूल करणे अशा काही उपाययोजनाचा कोरोनाचा प्रसार रोखण्यात उपयोग झाला, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
३६८५ खाटा रिकाम्या...
पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये २१ हजार १६९ खाटा आहेत. यापैकी १७ हजार ११३ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. तर ३६८५ खाटा मंगळवारी २.२३ वाजता रिकाम्या होत्या. मंगळवारी दिवसभरात ७६८० रुग्णांची नोंद झाली. यापैकी ४२२ दोनवेळा नोंद झाली होती, तर १८६ रुग्ण मुंबईबाहेरील होते. त्यामुळे दिवसभरात ७०७२ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या गेल्या पाच दिवसांमध्ये सर्वात कमी असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
८७ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत...
महापालिकेने दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मंगळवारी दिवसभरात ४७ हजार चाचण्या करण्यात आल्या. यापैकी सात हजार बाधित रुग्ण सापडले. तर सक्रिय रुग्णांमध्ये ८७ टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचा दावा आयुक्तांनी केला.
एप्रिल महिन्यातील आकडेवारी
तारीख... बाधित रुग्ण
२०.... ७०७२
१९.... ७३८१
१८....८४७९
१७.... ८८३४
१६ ..... ८८३९