खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:09 IST2025-09-08T13:08:34+5:302025-09-08T13:09:21+5:30

AC Local Train Mumbai latest news in marathi: मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एमआरव्हीसीने एमयूटीपी-३ आणि ३ए अंतर्गत खर्चाचे नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केली आहे.

Good news! Mumbai local travel is now smoother and faster; coaches will be like Vande Metro | खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे

खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा-संपन्न वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार १२ ते १८ डब्यांच्या २३८ लोकलसाठी २,८५६ एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते हे डबे वंदे मेट्रो प्रमाणे असणार आहेत. ‘लोकमत’ने ऑगस्ट महिन्यात सर्वात आधी यासंदर्भात वृत्त दिले होते. 

मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एमआरव्हीसीने एमयूटीपी-३ आणि ३ए अंतर्गत खर्चाचे नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केली आहे. यासाठी सुमारे १९,२९३ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकतीच यासाठी मंजुरी दिली. निविदा ८ ते २२ डिसेंबर दरम्यान उघडली जाणार असून, ती ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतीय कंपनीला हे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे.

लोकलचे डबे बनवण्यासह देखभाल दुरुस्तीसाठी देखील दोन नवीन इएमयू कारशेड उभारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेसाठी भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेसाठी वाणगावमध्ये हे कारशेड असतील. ही केंद्रे ज्या कंत्राटदाराला एसी लोकलचे कंत्राट मिळणार आहे, त्याच्या मार्फतच चालविण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले. एमआरव्हीसी मार्फत कंत्राट मिळणाऱ्या कंत्राटदाराला दोन वर्षांमध्ये पहिला प्रोटोटाइप सादर करावा लागणार आहे. 

कशी असेल एसी लोकल?

गर्दीनुसार वातावरण संतुलित करणारी अत्याधुनिक एचव्हीएसी प्रणाली

स्टीलच्या आसनांऐवजी गादीयुक्त आरामदायी आसने

वाढीव विद्युत शक्तीमुळे वेग ११० किमी/तास वरून १३० किमी/तास

अधिक वेगामुळे स्थानकांवरील वेळेचा अपव्यय कमी

एमयूटीपी-३ अंतर्गत ४७ लोकल, तर एमयूटीपी-३ए अंतर्गत १९१ लोकल

नवीन वंदे मेट्रो उपनगरीय डब्यांच्या खरेदीमुळे मुंबईच्या लोकल वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचा बदल घडेल. १२, १५ व १८ डब्यांच्या व अधिक लांब बंद दरवाजाच्या रेकमुळे सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चित होणार आहे. 
-विलास सोपन वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

Web Title: Good news! Mumbai local travel is now smoother and faster; coaches will be like Vande Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.