Join us  

खुशखबर ! 10 हजार शिक्षकांची मेगा भरती निघाली, मुख्यमंत्र्यांकडून जाहिरात लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 2:43 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली.

मुंबई - शिक्षक भरतीची आतुरततेनं वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर राज्य सरकारने आज पवित्र पोर्टलवरुन शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. यापूर्वी 2012 मध्ये शेवटची भरती घेण्यात आली होती. तब्बल सहा वर्षानंतर या शिक्षक भरतीची जाहिरात निघाल्याने अनेक डीए. बीएडधारक तरुण-तरुणींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे पोर्टलवरील या जाहिरातीचे प्रसिद्धीकरण केले. महाराष्ट्रात १०,००१ जागांपैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ अशी वर्गवारी जागांची करण्यात आली आहे. पवित्र पेार्टलच्या माध्यमातून ही भरती होत असल्याने पूर्णपणे भ्रष्टाचार विरहीत पहिलीच शिक्षक भरती होईल. त्यामुळे शिक्षक भरतीवेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात सरकारला यश मिळेल. 

शिक्षण भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी १६ टक्के आणि खुल्या गटातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू झाल्याने सर्व संस्थांना बिंदुनामावली तीन वेळा अद्यायावत करून तपासून घ्यावी लागली. या अडचणींवर मात करून अखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. राज्यातील शिक्षक भरतीवर २०१२ पासून निर्बंध घातल्याने गेल्या ६ वर्षांपासून शिक्षकांची पदे भरली गेली नाहीत. त्यानंतर अभियोग्यता चाचणी घेऊन पवित्र पोर्टल मार्फत गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होण्यास आणखी विलंब झाला. या पार्श्वभूमीवर पात्रताधारकांकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी राज्यभर आंदोलने केली जात होती. त्या पार्श्वभूमिवर आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली.

 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिक्षकमुंबईविनोद तावडे