Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरीब रुग्णांसाठी ‘गुड न्यूज’! कामा हॉस्पिटल करणार ‘टेस्टट्यूब बेबी’साठी मोफत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 08:41 IST

नवीन वर्षात जून महिन्यात हे केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे आत गरिबांनाही ‘गुड न्यूज’ मिळणार आहे.

मुंबई :  गेल्या काही वर्षांत तरुण जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक वेळा नैसर्गिक पद्धतीने त्यांना बाळ होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. यावरील उपचाराकरिता त्यांना अनेक वेळा आयव्हीएफ उपचार पद्धतीने टेस्टट्यूब बेबीसाठी प्रयत्न केले जातात.  या वंध्यत्व निवारणाच्या उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्रावर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च येतो. गरिबांना मात्र हा खर्च परवडत नसल्यामुळे ते उपचार घेत नाहीत.  मात्र, आता शासकीय रुग्णालयात प्रथमच कामा रुग्णालयात गरीब रुग्णांना हे उपचार अगदी मोफत मिळणार आहे. शुक्रवारी या केंद्रास शासनाकडून मान्यता मिळाली. याकरिता साडेचार कोटी खर्च केले जाणार आहेत. नवीन वर्षात जून महिन्यात हे केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे आत गरिबांनाही ‘गुड न्यूज’ मिळणार आहे. मुंबई शहरातील जिल्हा नियोजन समितीमार्फत या केंद्राचा खर्च करण्यात येणार आहे. शुक्रवारी या केंद्रास मान्यता दिली असून लवकरच केंद्राच्या उभारणीस रुग्णलयात सुरुवात होणार आहे. या खर्चात आयव्हीएफ प्रयोगशाळा, सोनोग्राफी मशीन, छोटे शस्त्रक्रियागृह, शुक्राणू  बँक तसेच येथील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच पाच वर्षे या केंद्राची देखभाल करण्याची जबाबदारी जी कंपनी हे केंद्र बनविणार आहे, त्यांची असणार आहे.       

आधुनिक जीवनशैलीमुळे चाळिशीत येणारे वंध्यत्व आता २५ ते ३० वयात दिसून येत आहे. तरुणपणीच अनेकांना मधुमेह आणि रक्तदाबाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.

करिअर करण्याच्या दृष्टीने उशिरा लग्न केले जाते. त्यामुळे  अनेक तरुण जोडप्यांना वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. विवाहानंतर बाळासाठी जोडपे प्रयत्न करत असतात. मात्र, काही वेळा नियमित संबंध ठेवल्यानंतर एका वर्षानंतरही बाळ होत नाही. त्यावेळी बाळ मिळण्यासाठीच्या उपचारांवर तरुण जोडपे लाखो रुपये खर्च करतात. 

काही दिवसांपूर्वी मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जे. जे. समूह रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीद्वारे या केंद्रासाठी निधी मंजूर केला.

आम्ही महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णांना हे उपचार मोफत देणार आहोत.  दोनच दिवसांपूर्वी या केंद्रासाठी मुंबई जिल्हा नियोजन समितीचे पत्र आले आहे. त्यांनी यासाठीच लागणार निधी मंजूर केला आहे. यामुळे गरिबांनाही आता महागडे उपचार मोफत मिळणार आहे. याकरिता आमच्या डॉक्टरांना कसे उपचार द्यायचे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आमचा लवकरात लवकर जून महिन्यापर्यंत हे केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय.

टॅग्स :हॉस्पिटलआरोग्य