मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला मिळालेला पूर्णविराम आणि शेअर बाजारात आलेली स्थिरता या दोन घटकांमुळे ९७ हजारांवर पोहोचलेला सोन्याचा भाव आता तोळ्याला ९२ हजारांवर आला आहे. सोन्याचा भाव तुलनेने कमी झाला असला तरी खरेदीसाठी ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे सराफ बाजाराकडून सांगण्यात आले.
एप्रिल महिन्यात लग्नसराईची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे सोने महाग असतानाही त्याची मागणी होती. परंतु आता लग्नसराईचा हंगाम मागे पडल्याने सोने खरेदीचा उत्साह कमी झाला आहे. ग्राहक सोनसाखळी, मंगळसूत्र, बांगड्या या दागिन्यांची खरेदी करत आहेत.
दरात वाढ झाल्याने खरेदीचा जोर ओसरलासोन्याचा भाव वाढल्याने खरेदी-विक्री कमी झाली. भाव ८५ हजार असताना ग्राहक सकारात्मक होते. खरेदी होत होती. भाव ९५ हजार झाल्यावर खरेदीचा जोर ओसरला.
सोन्याचा प्रतितोळा दर -
शनिवारी सोन्याचा भाव प्रतितोळा ९२ हजार नोंदविण्यात आला. तो आता ९० हजारांवर उतरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठ थंड आहे. केवळ लग्नसराईची खरेदी सुरू आहे. ग्राहक जुने सोने मोडून नवीन सोने करत आहेत. कुमार जैन, सराफ
सोन्याचा दर शुक्रवारी ९४ हजार प्रतितोळा नोंदविण्यात आला होता. यात किती चढ-उतार होतील, हे सगळे बाजारपेठांवर अवलंबून आहे. वाढत्या भावामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार स्थिरपणे सुरू आहेत. सर्वसाधारणपणे सोनसाखळी, अंगठी, मंगळसूत्र यांची खरेदी होत आहे. निर्भय सिंग, सुवर्णविक्रेते
१९ एप्रिलला सोन्याचा भाव ९८,७०० रुपये होता. २९ एप्रिलला सोन्याचा भाव प्रतितोळा ९८, ८०० नोंदविण्यात आला होता.