विमानतळावर १४ कोटींचे सोने, हिरे जप्त; अमली पदार्थही जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:50 IST2026-01-06T13:50:36+5:302026-01-06T13:50:49+5:30
या पाचही प्रकरणांत मिळून एकूण १४ कोटी ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विमानतळावर १४ कोटींचे सोने, हिरे जप्त; अमली पदार्थही जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने पाच स्वतंत्र प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करतानाच सोने व हिऱ्यांच्या तस्करीचादेखील पर्दाफाश केला आहे. या पाचही प्रकरणांत मिळून एकूण १४ कोटी ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात बँकॉक येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला आठ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीत तर दुसऱ्या प्रकरणातही बँकॉक येथूनच मुंबईत आलेल्या अन्य एका प्रवाशाला एक कोटी ९० लाख रुपयांच्या गांजाच्या तस्करीप्रकरणी अटक केली आहे. याखेरीज, एका व्यक्तीला दोन कोटी ५२ लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या तस्करी प्रकरणात अटक झाली आहे.
तस्करीत कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे उघड
चौथ्या प्रकरणात एका व्यक्तीला ११ लाख ३५ हजार रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. पाचव्या प्रकरणात सोने तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून, त्यात विमानतळावरील एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे आढळून आले.
बांगलादेशला निघालेल्या एका बांगलादेशी नागरिकाने ट्रान्झिटमध्ये असताना एक कोटी ८७ लाख रुपयांचे सोने या कर्मचाऱ्याकडे दिले.