Join us

रांगा लावून घेतले १५०० काेटींचे साेने; सराफ बाजारावर लक्ष्मी प्रसन्न, ग्राहकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 07:19 IST

धनत्रयोदशी ते भाऊबीज या चार-पाच दिवसांत सराफ बाजारात खरेदीची धूम असते.

मुंबई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी सराफ बाजारात ग्राहकांनी अक्षरश: रांगा लावल्या असून, लक्ष्मीपूजनापर्यंत मुंबईत सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीने १२०० ते १५०० कोटींचा आकडा ओलांडला. दिवाळी आणि लग्नसराई अशा दोन कारणांसाठी सोन्या-चांदीची खरेदी केली जात असून, भाऊबीजेपर्यंत खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत ५०० ते ७०० कोटींची भर पडेल, असा विश्वास सराफ बाजाराने व्यक्त केला आहे.

धनत्रयोदशी ते भाऊबीज या चार-पाच दिवसांत सराफ बाजारात खरेदीची धूम असते. यंदाचे वर्षही त्यास अपवाद ठरले नाही. लक्ष्मीपूजनापर्यंत मुंबईकरांनी १२०० ते १५०० कोटी रुपये दागिन्यांच्या खरेदीवर खर्च केले. सोने खरेदीसाठी ग्राहकांची उदंड गर्दी होती. विशेषत: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांनी अक्षरश: रांगा लावून सोने खरेदी केले. सोमवारी कामाचा दिवस असल्याने खरेदीचे प्रमाण कमी होते. सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी पाडव्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 

सोमवारी सोन्याचा भाव प्रतितोळा ५७ हजार ५०० रुपये एवढा होता. पाडव्याचे मार्केट याच भावाने ओपन होईल. दुपारी सोन्याच्या भावात चढ-उतार पाहण्यास मिळेल. लक्ष्मीपूजनला चांदीच्या नाण्यांची खरेदी विक्री मोठी झाली. याव्यतिरिक्त मंगळसूत्र, सोनसाखळी, बांगड्या आणि कानातले घेण्यावर ग्राहकांचा भर आहे. लग्नसराई सुरु होणार असल्याने त्याची खरेदीही मोठी होत आहे.     - निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते

पाडव्याला ७०० कोटींच्या खरेदीची शक्यता 

पाडव्याला मुंबईत सुमारे ५०० ते ७०० कोटी रुपयांची सोन्या-चांदीची उलाढाल होईल, असे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद  जगन्नाथ पेडणेकर यांनी सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्के अधिक उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहेत. लग्नसराई असल्याने सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहेत. सोन्याची नाणी चांगली विकली जात आहेत.  

टॅग्स :सोनंचांदी