गोखले उड्डाणपूल महिनाअखेर खुला; विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचेही काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:33 IST2025-04-26T10:32:37+5:302025-04-26T10:33:23+5:30
मुख्य बांधकाम पूर्ण, गोखले पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. तेली गल्ली पूल व गोखले पुलाच्या मधल्या भागाच्या काँक्रीटच्या कामाचे ‘क्युरिंग’ शुक्रवारी पूर्ण झाले. उर्वरित कामे वेगाने केली जात आहेत

गोखले उड्डाणपूल महिनाअखेर खुला; विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचेही काम अंतिम टप्प्यात
मुंबई - अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होतील. त्याचबरोबर विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे बांधकामही ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या पुलाची उर्वरित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली. बांगर यांनी शुक्रवारी या दोन्ही पुलांची पाहणी केली. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.
गोखले पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. तेली गल्ली पूल व गोखले पुलाच्या मधल्या भागाच्या काँक्रीटच्या कामाचे ‘क्युरिंग’ शुक्रवारी पूर्ण झाले. उर्वरित कामे वेगाने केली जात आहेत. ३० एप्रिलपर्यंत कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे बांगर यांनी सांगितले. गोखले पुलाच्या पूर्व दिशेकडील पोहोच रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. बर्फीवाला पूल जेथे उतरतो, तेथील बाजूचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे पोहोच रस्ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करावा, जेणेकरून नव्याने कार्यान्वित होणाऱ्या बर्फीवाला पुलाच्या दक्षिण भागातील उतारावरील वाहतूक सुरळीत होईल, असेही बांगर यांनी सांगितले.
वळणामुळे काम आव्हानात्मक
विक्रोळी पुलाचे पूर्व बाजूकडील तसेच रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. पश्चिमेकडे सेंट जोसेफ शाळेजवळ वळण असल्याने तेथे पुलाचे तीन स्पॅनवरील काम शिल्लक आहे. त्यावर ‘डेक स्लॅब’ टाकण्यात येणार आहे. हे काम अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक आहे. शाळा आणि रेल्वे स्थानक असे सातत्याने रहदारी असलेले परिसर जवळ असल्याने दक्षता घेत पालिका येथे काम करत आहे. उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी खुला करता येईल, असे निर्देश बांगर यांनी दिले.
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे एकूण १९ पिलर उभारले आहेत. त्यापैकी पूर्वकडील बाजूला १२, तर पश्चिमेकडील बाजूना ७ पिलर उभारले आहेत. आतापर्यंत या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात पूर्वेकडील तसेच रेल्वे हद्दीतील काम आणि पश्चिमेकडील चढ-उतार मार्गी लागल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.