गोखले पूल मे महिन्यात पूर्ण क्षमतेने खुला, पूल विभागाकडून बांधकामाच्या कामाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:00 IST2025-03-16T14:59:57+5:302025-03-16T15:00:20+5:30
गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, तो भाग २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या, त्यावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मुभा आहे.

गोखले पूल मे महिन्यात पूर्ण क्षमतेने खुला, पूल विभागाकडून बांधकामाच्या कामाला वेग
मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे बांधकाम वेगाने सुरू असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यांत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. महापालिकेचा पूल विभाग त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे.
सी. डी. बर्फीवाला रोड आणि एन. एस. फडके रोड यांना जोडणाऱ्या गोखले पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
पुलाच्या खर्चात वाढ
पुलांतील हे अंतर कसे कमी करता येईल, यासाठी प्रशासकीय स्तरावर बराच काळ चर्चा सुरू होती. हा पेच सोडवण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेतील तज्ज्ञांची मदत घेण्यात अली. पुलाची पाहणी करून त्यांनी काही उपाय सुचवले. त्यानुसार पालिकेने उपाययोजना हाती घेतल्या. मात्र, त्यामुळे पुलाच्या खर्चात भर पडली.
फेब्रुवारी २०२४ पासून हलक्या वाहनांना मुभा
गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, तो भाग २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या, त्यावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मुभा आहे.
पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील काम नुकतेच पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
दरम्यान, या पुलाचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असा पालिकेचा कयास होता. मात्र, कामाची गती लक्षात घेता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम पूर्ण होऊन दुसऱ्या आठवड्यात तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.