Join us  

Goa Assembly Election 2022: महाविकास आघाडीत बिघाडी, राऊत म्हणाले, गोव्यात काँग्रेस 40 पैकी 45 जागा जिंकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 3:37 PM

Goa Assembly Election 2022: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून, गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे, असे म्हटले.

मुंबई - आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Election 2022) महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात होता. मात्र, काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेच्या आघाडीच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना चांगलाच धक्का बसल्याचे दिसून येते. कारण, राऊत यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. त्यामुळे, गोव्यातील महाविकास आघाडीत आता बिघाडी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून, गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे, असे म्हटले. काँग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातली काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण, ठीक आहे त्यांना तरंगू द्या, मग तडाखे बसतात, असा टोला राऊत यांनी लगावला. 

शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत. काँग्रेससाठी आम्ही प्रयत्न केला. त्यांच्यासोबत चर्चा केली. पण त्यांना असं वाटतं 40 पैकी 45 जागा मिळतील. पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असं त्यांना वाटतं. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षावला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? त्यांनी 40 पैकी 45 जागा जिंकल्या तरी हरकत नाही, असा खोचक टोमणा राऊत यांनी काँग्रेसला काढला.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढेल

सध्या शिवसेनेची १० जणांची यादी तयार आहे. परंतु अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या ठिकाणी आल्यावर आम्ही चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. आदित्य ठाकरे यांनीदेखील एक टीम यासाठी पाठवली आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर मुंबईतील प्रमुख लोक या ठिकाणी येऊन काम करतील आणि मार्गदर्शनही करतील. निवडणुकीला पुढे घेऊन जातील, असंही राऊत म्हणाले. 

ठाकरे सरकारचा प्रभाव आहे

गोव्यात शिवसेना रुजते आणि रुजली आहे. महाराष्ट्र सरकारचा प्रभाव आहे, ठाकरे सरकारचा प्रभाव आहे, शिवसेनेचे काम करत आहेत. आमचे लोक आणि भाजपा विषयी त्यांच्या सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे. इथे जो गोव्यात भाजप दिसत आहे, कुठे आहे पक्ष त्यांचा? कधीही स्वबळावर त्यांचे इथे सरकार आले नाही. मनोहर पर्रिकर होते तेव्हाही. बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे त्याचे आमदार फोड, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.  

टॅग्स :संजय राऊतकाँग्रेसगोवाशिवसेनागोवा विधानसभा निवडणूक २०२२