Join us  

महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईचे वैभव, तुमच्याकडे पुरावे आहेत का?; दरेकरांचा ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 4:22 PM

आदित्य ठाकरेंच्या आरोपावर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई: महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जमीन बळकावण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रेसकोर्सच्या एकूण जमीनीपैकी काही जमीन रेसकोर्ससाठी राखीव ठेवून उर्वरित जागेचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे एक विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला धमकावत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या या आरोपावर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जागा विकताहेत तर त्याचे काही पुरावे आहेत का?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स हे मुंबईचे वैभव आहे. कुठलेही सरकार असो मुंबईचे वैभव असलेल्या जागा विकल्या जातील, बिल्डरच्या घशात घातल्या जातील असे मला वाटत नाही. त्याचे रक्षण करण्याचे काम आम्ही करू, असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

प्रवीण दरेकरांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ईव्हीएममुळे अनेक राज्यात काँग्रेसचा विजय झाला आहे. त्याविषयीं संजय राऊत यांचे म्हणणे काय? तेलंगणात विजय झाला. तिथे काय ईव्हीएम अपवाद आहे का? संजय राऊत भरकटल्यासारखे बोलत असतात. त्यांच्या म्हणण्याला आम्ही फारशी किंमत देत नाही. संजय राऊत ना शिवसेनेच्या कुठल्या आंदोलनात, ना राम मंदिराच्या आंदोलनात फक्त मीडियात येणे. राणा भीमदेवी थाटात मोठमोठ्या गर्जना करणे हे कामं त्यांचे असल्याची टिकाही दरेकरांनी केली.

प्रभू श्रीराम हे देशवासियांचे दैवत-

प्रभू श्रीराम हे देशवासियांचे दैवत आहे. चांगल्या कामात टीकाटीपण्या नको. निमंत्रण सर्वांना पाठवले आहे. दर्शन एक दिवस नसून नंतरही चालूच राहणार आहे. प्रत्येक दिवशी देशातील प्रत्येकाने जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले पाहिजे. परंतु आता टीका करायला कुठलाही विषय नाही. आम्ही राम हायजॅक केला असे सांगून वातावरण कलुशीत करण्याचा प्रयत्न काहींचा आहे. प्रभू रामाच्या मंदिरासाठी कुणी लढे उभारले, कुणी कारसेवा केली, कुणी आंदोलन केले हे देशवासियांना माहित आहे, असा टोलाही यावेळी दरेकरांनी विरोधकांना लगावला.

टॅग्स :आदित्य ठाकरेप्रवीण दरेकरमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदे