‘’PSI उमेदवारांना पदाच्या भरतीच्या वयोमर्यादेत सवलत द्या’’, विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 20:37 IST2026-01-02T20:36:34+5:302026-01-02T20:37:10+5:30
Vijay Wadettiwar News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत वयोमर्यादेमुळे हजारो तरुण तरुणी अपात्र ठरत आहे.या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन देखील केले आहे.या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

‘’PSI उमेदवारांना पदाच्या भरतीच्या वयोमर्यादेत सवलत द्या’’, विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
नागपूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत वयोमर्यादेमुळे हजारो तरुण तरुणी अपात्र ठरत आहे.या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन देखील केले आहे.या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उमेदवारांना सरसकट वयोमर्यादेत सवलत देण्याची आग्रही मागणी केली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ च्या जाहिरातीमध्ये वयाची मर्यादा ही १ नोव्हेंबर २०२५ या दिनांकावर आधारित धरण्यात आली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी केवळ काही दिवस किंवा महिन्यांच्या फरकाने परीक्षेला बसण्यास अपात्र ठरले आहेत.
शासन आणि आयोगाच्या स्तरावर जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे. यात विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना संधी नाकारणे अन्यायकारक असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रात उल्लेख केला आहे.२०२४ मध्ये राज्य शासनाने वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत दिली होती. त्याच धर्तीवर २०२५ च्या परीक्षेसाठीही सवलत मिळावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
नुकत्याच झालेल्या पोलीस शिपाई भरतीमध्ये (२०२२-२५) वयोमर्यादेत सवलत देऊन 'एक विशेष संधी' देण्यात आली होती. तोच न्याय PSI पदाच्या उमेदवारांनाही द्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांना केली. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात राहून गरिबांची मुले दिवसरात्र अभ्यास करतात. केवळ प्रशासकीय विलंबामुळे त्यांचे स्वप्न धुळीस मिळणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून वयोमर्यादेत वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय काढावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.