गणेशोत्सवापूर्वी पीओपीला सक्षम पर्याय द्या...! एमपीसीबीसोबत बैठकीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:22 IST2024-12-23T06:21:47+5:302024-12-23T06:22:20+5:30
मुंबईच्या गणेशोत्सवामुळे साधारणपणे दहा हजार कोटींची उलाढाल

गणेशोत्सवापूर्वी पीओपीला सक्षम पर्याय द्या...! एमपीसीबीसोबत बैठकीची मागणी
मुंबई : पुढील वर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक व्हावा याकरिता मुंबई महापालिकेने मूर्तिकारांना शाडूची माती व जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी महापालिकेने आयोजित बैठकीत पालिका प्रशासनाने ही माहिती दिली. प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तिकार संघटनांची बैठक आयोजित करावी आणि पीओपीला सक्षम पर्याय द्यावा, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
मुंबईच्या गणेशोत्सवामुळे साधारणपणे दहा हजार कोटींची उलाढाल होत असते. यामुळे अनेकांना रोजगार मिळतो, तसेच केंद्र शासनाला जीएसटीपण मिळत असतो. अशा परिस्थितीत नियमितपणे गणेश मंडळ ज्या (पीओपी) मूर्तीची प्रतिष्ठापना करतात ते जर पर्यावरणपूरक नाही तर त्याला पर्याय पर्यावरण विभागाने कारवाई करण्यापूर्वी द्यावा, असे मत समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केले.
पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रयत्न
सार्वजनिक, तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांना शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याचे, तसेच घरगुती गणपती हे पर्यावरणस्नेही साहित्यांनी बनवण्याचे आवाहन पालिकेने केले.
घरगुती गणपतींची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित ठेवून कृत्रिम तलावांतच विसर्जन करण्याचेही आवाहन केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही पर्यावरणस्नेही उत्सवासाठी आवाहन करून कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे आवाहन केले, त्यासाठी २०० हून अधिक कृत्रिम तलाव तयार केले.
गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणस्नेही व्हावा यादृष्टीने शाडूच्या मातीच्या मूर्ती बनण्यासाठी पालिकेने मूर्तिकारांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली.