Join us

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ पूनावाला यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 05:29 IST

उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका

ठळक मुद्देपूनावाला यांचे सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिशिल्ड या कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही लस आवश्यक आहे.

मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला व त्यांच्या कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याने त्यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा द्यावी. त्यांना धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी फौजदारी रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. गेल्या महिन्यात पूनावाला यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, त्यांना देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडून व मोठ्या व्यक्तींकडून धमक्या मिळत आहे. ते आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित नाही. या पार्श्वभूमीवर वकील दत्ता माने यांनी सुरक्षेची व धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.

पूनावाला यांचे सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिशिल्ड या कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही लस आवश्यक आहे. सिरमने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी सीईओचे देशात असणे आवश्यक आहे. अन्यथा लसनिर्मिती मंदावेल. त्यामुळे पूनावाला व सिरमच्या संपत्तीचे रक्षण करावे, असेही याचिकेत नमूद आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पुणेकोरोनाची लसअदर पूनावाला