Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात वाहून गेलेली मुलगी, थेट सापडली उत्तर प्रदेशात; बनाव रचल्याचा पोलिसांना संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 08:39 IST

पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही लोकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून या मुलीचा शोध लागत नसल्यामुळे नाल्यात वाहून गेलेली सदर मुलगी नक्की गेली कुठे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

- मंगेश कराळे

नालासोपारा : धानिवबाग येथील दीक्षा यादव (१५) ही अल्पवयीन मुलगी १६ ऑगस्टला मुसळधार पावसात उघड्या नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. पण आता ती उत्तर प्रदेशच्या बनारस येथील मामाच्या घरी आहे. तिने पळून जाण्यासाठी हा बनाव रचल्याचा पेल्हार पोलिसांना संशय आहे. मुलीच्या आईवडील व भावाला सोमवारी पेल्हार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.

धानिवबागच्या सिद्धिविनायक चाळीत राहणारी दीक्षा यादव (१५) ही मंगळवारी दुपारी एक वाजता ती शौचालयासाठी गेली होती. तेथून घरी परतत असताना पाय घसरून नाल्यामध्ये पडली. ती बेपत्ता झाली अशी माहिती सदर मुलीच्या भावाने दिल्यावर पेल्हार पोलीस अग्निशमन दलाच्या मदतीने तिचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. या घटनेनंतर वसईत एकच खळबळ उडाली होती. पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही लोकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून या मुलीचा शोध लागत नसल्यामुळे नाल्यात वाहून गेलेली सदर मुलगी नक्की गेली कुठे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

अशातच आता या दुर्घटनेसंबंधी नवीन माहिती समोर आली आहे .सदर मुलगी उत्तर प्रदेशच्या बनारस येथे मामाच्या घरी सुखरूप असल्याची माहिती तिच्या आई-वडिलांकडून देण्यात आलेली आहे. घटनेच्या दिवशी आजारी मुलीला औषध घेण्यासाठी तिचे वडील ओरडल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पाच दिवसानंतर सदर मुलगी उत्तर प्रदेश येथे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नक्की ही मुलगी नाल्यात पडली होती का? कोणालाही न सांगता घर सोडून मामाच्या घरी निघून जाण्याचे कारण काय? तिला कोणी सोबत घेऊन नेले होते का? असे अनेक प्रश्न आता समोर आले असून पोलीस तपासात ही बाब निष्पन्न होणार आहे. 

मुलीचा जवाब नोंदविणार! मुलगी नाल्यात वाहून गेल्याची मिसिंग पोलीस ठाण्यात दाखल आहे. ती बनारस येथील मामाच्या घरी रविवारी सुखरूप पोहोचल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. मुलगी आल्यावर तिचा जवाब घेण्यात येईल. तसेच नक्की कोणत्या कारणांमुळे ती गेली याचा तपास करण्यात येईल. - विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)

टॅग्स :गुन्हेगारी