Join us  

मुंबईत छेडछाडीच्या भीतीने तरुणीची चालत्या ट्रेनमधून उडी, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 11:17 AM

विनयभंगाच्या भीतीने विद्यार्थिनीने लोकलमधून उडी मारल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती.

मुंबई - तरुणीने चालत्या लोकलमधून उडी मारल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अश्रफअली करीमुल्ला शेख (२५) असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी 12  वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शीव येथील कोळीवाडा येथे आरोपी वास्तव्यास होता. आरोपीवर दादर पोलीस स्थानकात ऑगस्ट महिन्यात मोबाइल चोरीचा गुन्हा नोंद आहे. गुरुवारी सकाळी आरोपी सीएसएमटी स्थानकात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपी अनाथआश्रम मध्ये राहत असून तो विवाहित आहे. त्याला दोन वर्षांची मुलगी आहे.

22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली. रविवारी सकाळी 9.29 च्या लोकलने पायल कांबळे ट्युशनसाठी जात होती. यावेळी एक तरुण महिलांच्या डब्यात चढला. यावेळी छेडछीच्या भीतीने पायलने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. यामध्ये तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 

जीआरपी अधिका-यांनी पायलने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचं रेखाचित्र रेखाटण्यात आलं होतं. 'आम्ही सीएसएमटी आणि मस्जिदचं सीसीटीव्ही तपासत असून, आरोपीची ओळख पटवण्यासाठी पायलला दाखवत आहोत. कदाचित फोन किंवा दागिन्यांच्या चोरीसाठी हा प्रयत्न झाला असावा. आम्ही पायलचा जबाब नोंदवला आहे', अशी माहिती अधिका-याने दिली होती. अखेर आरोपीला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश मिळालं आहे. 

'मला क्लासला जाण्यासाठी उशीर झाला होता, त्यामुळे मी मधील सेकंड क्लास लेडिज अपार्टमेंटमध्ये चढली. त्यावेळी डब्यात कोणतीही महिला प्रवासी नव्हती. ट्रेन सुरु झाल्यानंतर अचानक एक तरुण डब्यात घुसला. मी घाबरले आणि अलार्म चेन ओढली, पण ट्रेन थांबली नाही. त्या तरुणाने मला शांत राहायला सांगितलं. यानंतर मी अजून घाबरले, आणि पुन्हा चेन ओढण्यास सुरुवात केली. तो पुन्हा पुन्हा वॉर्निंग देऊ लागला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला', अशी माहिती पायलने दिली होती. 

घाबरलेली पायल ट्रेनच्या दरवाजावर आली. ट्रेनचा वेग कमी असल्याने तिने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. त्यावेळी काही गँगमॅन तिथे उपस्थित होते. त्यांनी तिला पडताना पाहिलं आणि धाव घेतली. तिला जखमी अवस्थेत प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आणण्यात आलं होतं. 

'माझ्या आईला फोन करुन माहिती देण्यात आली आणि मला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझ्या पायाला प्रचंड दुखापत झाली होती, त्यातून रक्त वाहत होतं. पायाकडे पाहण्याची माझी हिंमतही होत नव्हती', असं पायलने सांगितलं होतं. घटना घडली तेव्हा पायलचे वडिल शहराबाहेर होते. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं ते बोलले होते.  

 

टॅग्स :मुंबई लोकलगुन्हाविनयभंग