मुंबई : पाकिटातून न सांगता वारंवार पैसे काढते, या रागातून एका महिलेने तिच्या ११ वर्षांच्या मुलीला मारहाण करत गालावर, हातापायावर चटके दिले. हा धक्कादायक प्रकार मालाड पूर्व परिसरात घडला. स्थानिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर कुरार पोलिसांनी त्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अनिता चंदनशिवे या महिला बालविकास संरक्षण कक्षामध्ये पर्यवेक्षक आहेत. हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर १० एप्रिल रोजी दुपारी मालाड पूर्वच्या कोकणी पाडा परिसरातील स्थानिकांनी फोन करत ३७ वर्षीय महिलेने तिच्या ११ वर्ष वयाच्या मुलीला मारहाण करत चटके दिल्याचे कळवले.
चंदनशिवे यांनी कुरार पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आईने चमचा गरम करत डाव्या-उजव्या पायाच्या मांडीवर, हातावर आणि गालावर चटके दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी आईकडे विचारणा केल्यावर मुलगी त्यांना न विचारता पर्समधील पैसे वारंवार काढते. या रागात त्यांनी हा प्रकार केल्याची कबुली दिली.