Join us  

आझाद मैदानातील आंदोलनाची गिरीश महाजनांकडून दखल, 'सिंचन सहायक' पदास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 7:22 PM

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सचिव राजेंद्र पवार यांनी आझाद मैदानातील आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या.

मुंबई - जलसंपदा विभागाच्या तृतिय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या जलसंपदा सचिव राजेंद्र पवार यांनी मान्य केल्या असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे दीलीप आंधळे यांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागातील तृतीय श्रेणी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनास बसले होते. मात्र, अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे राळेगणसिद्धी येथे होते. त्यामुळे या उपोषणकर्त्यांची दखल घेण्यास महाजन यांना उशिर झाला. मात्र, देर आये दुरूस्त आए, असेच म्हणावे लागेल.  

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सचिव राजेंद्र पवार यांनी आझाद मैदानातील आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या. कालवा निरीक्षक, दप्तर कारकून आणि मोजणीदार या पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक हे पद निर्माण करावे, 2400 रुपये ग्रेड पे देण्यात यावा, आदी मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 4 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात राज्यातील सुमारे दीड हजार कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मंत्री महाजन यांनी सचिवांना योग्य दखल घेण्याचे आदेश दिले होते. सचिवालयातील दालनात झालेल्या बैठकीत मागण्या मान्य केल्याचे सचिवांनी उपस्थित संघटनेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. 

टॅग्स :गिरीश महाजनपाटबंधारे प्रकल्प