विक्रोळीमध्ये गर्डरची मोहीम फत्ते ! गांधीनगर जंक्शन येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील अवघड टप्पा ‘एमएमआरडीए’कडून पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:43 IST2025-04-30T10:42:33+5:302025-04-30T10:43:05+5:30
मेट्रो ४ मार्गिकेचा गायमुख ते ठाण्यातील कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. तर, या मेट्रोचा कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

विक्रोळीमध्ये गर्डरची मोहीम फत्ते ! गांधीनगर जंक्शन येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील अवघड टप्पा ‘एमएमआरडीए’कडून पार
मुंबई : वडाळा-कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेवर विक्रोळीतील गांधीनगर जंक्शन येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ५४० मेट्रिक टन वजनाचा स्टील गर्डर उभारण्यात आला आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस) रोड, स्वामी समर्थनगर मेट्रो ६ मार्गिका आणि मेट्रो ४ एकमेकांना भेदत असलेल्या जंक्शनलाच या गर्डरची उभारणी एमएमआरडीएने करीत या मार्गिकेतील अवघड टप्पा पार केला. जमिनीपासून २४ मीटर उंचीवर हा ३० मीटर लांबीचा गर्डर उभारण्यात आला आहे.
मेट्रो ४ मार्गिकेचा गायमुख ते ठाण्यातील कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. तर, या मेट्रोचा कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या मार्गाचे कामही वेगाने पूर्ण करण्यावर एमएमआरडीएकडून भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून गांधीनगर जंक्शन येथे अतिशय अवघड पुलाची उभारणी एमएमआरडीएकडून केली जात आहे.
तब्बल ५४० मेट्रिक टन वजन, ६२.७ मीटर लांबी
गांधीनगर भागात एलबीएस रोड, जेव्हीएलआर उड्डाणपूल, मेट्रो ६ आणि मेट्रो ४ मार्गिका असे चार वाहतूक मार्ग एकमेकांना छेदतात. त्या भागात जंक्शनला मेट्रो ४ मार्गिकेचा २४ मीटर उंचीवर ५४० मेट्रिक टन वजनाचा ६२.७ मीटर लांबीचा विशेष स्टीलचा पूल एमएमआरडीए टप्प्याटप्प्याने उभारत आहे.
यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, ३० मीटर लांब गर्डर यशस्वीपणे जेव्हीएलआर आणि मेट्रो ६ मार्गिकेच्या खाली उभारला आहे. आता विक्रोळीच्या बाजूला उर्वरित १७ मीटर आणि मुलुंडच्या बाजूला १५ मीटर गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आव्हानात्मक काम
एलबीएस मार्ग आणि जेव्हीएलआर या रस्त्यांवर कायमच वाहनांची वर्दळ असते. तसेच जंक्शनला वाहनांची कोंडी होते. त्यामुळे येथे गर्डर उभारण्याचे काम आव्हानात्मक होते. मात्र एमएमआरडीएच्या टीमने नियोजन करून हे काम पूर्ण केले, असेही एमएमआरीडएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.